कोल्हापूर प्रतिनिधी | ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन वंचित विकास आघाडीतर्फे लोकसभेच्या पाच जागांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, पुणे मतदारसंघातून विठ्ठल सातव, बारामती येथून नवनाथ पडळकर, सातारा मतदारसंघातून सहदेव ऐवळे, माढा येथून विजयराव हणमंत मोटे, सांगली येथून जयसिंग उर्फ तात्या शेंडगे यांच्या नावांची त्यांनी घोषणा केली. मंळवारी कोल्हापूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांची सभा पार पडली. या सभेत त्यांनी या उमेदवारांची नावे घोषित केली. इतकेच नाही तर काँग्रेस राष्ट्रवादीने चर्चेला आणखी उशीर लावला तर इतरही उमेदवार घोषित करू असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
प्रकाश आंबेडकर आणि असद्दुदीन ओवेसी यांची आघाडी आहे. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र जागांवरून अडल्याने आंबेडकरांनी त्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. कोल्हापूर येथे डाॅ. आंबेडकर यांची शिवाजी स्टेडियमवर सभा झाली. यामध्ये त्यांनी ही घोषणा केली.
48 जागांवर तयारी पूर्ण झाली असून आम्ही स्वबळावर निवडणुकीला सामोरं जाऊ
दरम्यान भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत आपला पक्ष महाराष्ट्रातील सर्व 48 जागा लढवणार अशी घोषणाही 3 फेब्रुवारीला केली होती. काँग्रेसकडून आघाडीचा कोणताही प्रस्ताव आजवर आला नसून जोवर आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत जागांची चर्चा होणार नाही’ असं भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नुकतंच स्पष्ट केलं होतं. तसंच ‘काँग्रेस जर 12 जागा देणार नसेल तर वंचित बहुजन आघाडी राज्यातील 48 जागांवर तयारी पूर्ण झाली असून आम्ही स्वबळावर निवडणुकीला सामोरं जाऊ असा इशारा आंबेडकरांनी काँग्रेसला दिला.
प्रकाश आंबेडकर आणि असद्दुदीन आेवेसी यांच्या एमआयएम पक्षासोबत स्थापन केलेली वंचित बहुजन आघाडी ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण या आघाडीमुळे जे काही भाजपविरोधातील मतं असतील त्यांच्यात विभागणी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.