हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील लोकसभा उमेदवारांची भाजपने पहिली यादी जाहीर केली असली तरी अजूनही महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. यात महाविकास आघाडीकडून वंचितला निर्णय घेण्यासाठी 24 तासांची वेळ देण्यात आली आहे. त्यापूर्वीच वंचितने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जन खरगे (Mallikarjun Kharge) यांना पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये नेते प्रकाश आंबेडकर यांनी “वंचित(VBA) काँग्रेसच्या सात जागांना जाहीर पाठिंबा देईल, असे सांगितले आहे. तसेच, “आम्हाला आघाडीत काँग्रेसला देण्यात आलेल्या कोट्यातून 7 मतदारसंघांची नावे द्यावीत” अशी विनंती आंबेडकरांनी केली आहे. त्यामुळे आता याबाबत काँग्रेस नेमकी काय भूमिका घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून वाद वाढत चालला असतानाच आज प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे. याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देत त्यांनी म्हटले आहे, “मी महाराष्ट्रातील 7 जागांवर काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, खर्गेजी यांना विनंती केली आहे की मला, महाविकास आघाडीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला देण्यात आलेल्या कोट्यातून 7 मतदारसंघांची नावे द्यावीत. वंचित बहुजन आघाडी तुमच्या पसंतीच्या या 7 जागांवर तुमच्या पक्षाच्या उमेदवारांना सर्व प्रकारचा आणि धोरणात्मक पाठिंबा देईल. वंचित बहुजन आघाडीकडून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छांचाच नाही तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा हात देणाराही आहे.”
दरम्यान राज्यातील लोकसभा निवडणुकांना अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच पक्ष आपापल्या पातळीवर जोरदार तयारी करत आहेत. यात महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा फॉर्मुला ठरविण्यात आला असला तरी तो अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. महाविकास आघाडीच्या फॉर्मुलानुसार, ठाकरे गटाला 20 जागा, काँग्रेसला 15, शरद पवार राष्ट्रवादी 9 जागा आणि वंचितला 4 अशा जागा जागा देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. परंतु चार पैकी राज्यातील दोन जागांमध्ये आम्ही जिंकू शकणार नाही म्हणून वंचितने आघाडीचा हा प्रस्ताव नाकारला आहे.