फुटलेल्या पक्षांनी आधी त्यांची ताकद पाहावी; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे- पवारांवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला चारीमुंड्या चित करण्यासाठी राज्यातील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) सुद्धा समावेश करण्यात आलाय. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी आज थेट महाविकास आघाडीलाच इशारा दिला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी स्वबळावर ६ जागा जिंकू शकेल त्यामुळे फुटलेल्या पक्षांनी आधी त्यांची ताकद पाहावी असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा असून सुटलेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर आंबेडकरांनी हा इशारा दिला आहे.

नागपूरच्या रविभवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘शिवसेना (ठाकरे गट ) , राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून वाद सुरू आहे आणि आम्ही अजूनही बाहेरच आहोत. त्यांनी त्यांच्या जागावाटपाचा प्रश्न सोडवल्यानंतर आमची चर्चा सुरू होईल. अन्यथा वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात लोकसभेच्या कमीत कमी सहा जागा स्वबळावर जिंकू शकते आणि आघाडी न झाल्यास लोकसभेच्या 46 जागांवर आपले उमेदवार उभे करण्यास वंचित तयार आहे असेही त्यांनी म्हंटल. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने राज्यातल्या ४८ पैकी २७ जागांवर आमची ताकद असल्याचं पत्र मविआ नेत्यांना दिलं होतं. त्यामुळे वंचितच्या मविआ प्रवेशाबाबत अनेकांच्या मनात साशंकता आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “फुटलेल्या पक्षांनी आधी त्यांची ताकद पाहावी. आपली ताकद पाहूनच त्यांनी आघाडीत जागा मागाव्यात. उद्या असं होऊ नये की, कोंबडी आम्ही शिजवली. त्यानंतर आम्हाला फक्त कोंबडीचं मुंडकं दिलं आणि उरलेली कोंबडी इतर लोक घेऊन गेले. आम्ही तसं होऊ देणार नाही. आमच्या लोकांना सांगितलं आहे, आपण शेवटच्या क्षणापर्यंत थांबू. मिळून मिसळून आणि सन्मानाने कोंबडी खाऊ.”