सोलापूर प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघामधून राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आणि विद्यमान आमदार प्रणिती शिंदे या मतदारसंघातून पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. वेगवेगळ्या मतदारसंघांमधून प्राथमिक कल हाती येऊ लागले आहेत.
आज सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. यानंतर काही मिनिटातच मतमोजणीचे कल हाती येऊ लागले. दरम्यान सोलापूर शहर मध्य मतदारसंघामधून प्रणिती यांच्याविरोधात ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत. प्रणिती शिंदे पिछाडीवर पडल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच धाकधूक वाढली आहे. दरम्यान निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सोलापूरमधील एका जाहीर कार्यक्रमात सुशील कुमार शिंदे यांनी भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक होण्याची शक्यता व्यक्त केली होती. ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी भविष्यात एक होण्याची शक्यता आहे.
खरंतर शरद पवार आणि माझ्यात फक्त साडेआठ महिन्यांचा फरक आहे. कधीकाळी आम्ही एकाच आईच्या मांडीवर वाढलो आहोत. जे झालं त्याबाबत आमच्याही मनात खंत आहे आणि त्यांच्याही मनात खंत आहे. पण ते कधी बोलून दाखवत नाहीत. पण वेळ येईल तेव्हा ते नक्की बोलून दाखवतील,’ असं वक्तव्य शिंदे यांनी केलं होतं. या वक्तव्यावरुन नंतर भाजपा आणि शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली होती. दरम्यान आज दुपार पर्यंत या मतदारसंघाचा निकाल लागण्याची शक्यता आहे.