हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असं वादग्रस्त विधान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवरायांवर वादग्रस्त विधान केल्यामुळे आधीच राजकीय वातावरण तापलं आहे, त्यात आता नव्याने भर पडली आहे.
याबात राष्ट्रवादी काँग्रेसने विडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत प्रसाद लाड म्हणतात, संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला. त्यानंतर रायगडावर त्यांचं बालपण गेलं. रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे सुरुवात कोकणात झाली,’ असे विधान प्रसाद लाड करताना दिसत आहेत.
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या.@PrasadLadInd@BJP4Maharashtra pic.twitter.com/gU1P43QLFD
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) December 4, 2022
यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसने लाड आणि भाजपवर निशाणा साधला आहे. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या, असं राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हटलं आहे. आता प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या अडचणीत वाढ होणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. कारण यापूर्वीच राज्यपालांनी शिवरायांवर वादग्रस्त विधान केल्यामुळे विरोधक आणखीनच आक्रमक झाले आहेत.