सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
जावली तालुक्यातील प्रतापगड साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दि. 13 मार्च रोजी मतदान होणार आहे. तर दि. 14 मार्चला मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणूक कार्यक्रमामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मेढा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रतापगड कारखाना लि. सोनगाव करंदोशी या संस्थेची अधिसूचना जारी केली आहे. या ठिकाणी संचालक मंडळाच्या एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यात व्यक्ती व ऊस सभासद गटातून 15 जागा आहेत.
यामध्ये गट नं. 1 कुडाळ, गट नं. 2 खर्शी सायगांव, गट नं. 3 हुमगाव, गट नं. 4 मेढा, गट नं. 5 महाबळेश्वर या 5 गटातून संचालकांच्या प्रत्येकी 3 जागा आहेत. तसेच उत्पादक संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था 1, महिला राखीव 2, अनु. जाती व जमाती राखीव 1, विमुक्त जाती व भटक्या जमाती राखीव १, इतर मागास प्रवर्ग १ अशा २१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमामध्ये दि. 4 ते 10 फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन पत्र यादी प्रसिद्धी, दु. 3.30 नंतर नामनिर्देशन पत्र छाननी, दि. 11 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र यादी प्रसिद्धी, दि. 14 फेब्रुवारी – नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची तारीख, दि. 14 ते 28 फेब्रुवारी स. 11 ते दु. 3 पर्यंत उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्धी व चिन्ह वाटप, दि. 13 मार्च आवश्यक असल्यास मतदान, दि. 14 रोजी मतमोजणी होणार आहे.