हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर केंद्राकडून प्रथमच शिंदे गटाला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. शिंदे गटाचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची माहिती-तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 40 आमदार आणि 12 खासदारांसह शिंदे गटाने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर केंद्र सरकारकडून शिंदे गटाला मंत्रिपद मिळेल अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. त्याच पार्श्वभूमीवर हे पद देण्यात आलं आहे.
केंद्र सरकारकडून संसदेच्या स्थायी समितीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या बदलांमध्ये शिंदे गटालाही महत्त्वाचं स्थान देण्यात आलं असून प्रतापराव जाधव यांच्या रुपाने शिंदे गटाला माहिती तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रतापराव जाधवांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
प्रतापराव जाधव यांनी 2 दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सनसनाटी आरोप केला होता. सचिन वाझे 100 कोटी रुपयांची वसुली करुन मातोश्रीवर पोहोचवत होता असा गंभीर आरोप त्यांनी आपल्या भाषणात केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्या वरून घुमजाव करत मला तस म्हणायचं नव्हतं तर महाविकास आघाडी म्हणायचं होत असं स्पष्टीकरण दिले.