हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. शाई फेकणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मात्र शाईफेक ही तर संभाजी ब्रिगेड ची उत्सफूर्त प्रतिक्रिया आहे असे म्हंटल आहे.
दरेकर म्हणाले, आम्ही काही संभाजी ब्रिगेडच्या लोकांना शाई फेकायला सांगितली नाही. पण ती त्यांची उत्सफूर्त प्रतिक्रिया आहे. त्यांना वेगळ्या मार्गाने प्रतिक्रिया देता आली असती. लिखाण करता आलं असतं. पण प्रत्येकाची पद्धत असते. काही लोक लेखणीतून वार करतात. संभाजी ब्रिगेडची काम करण्याची पद्धत आक्रमक आहे. त्यामुळे त्यांनी लेखणीपेक्षा अशा गोष्टींना महत्व दिलं असेल, असं दरेकर म्हणाले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या घटनेवर नाराजी व्यक्त केली होती. शाई फेक करणे पूर्णपणे चुकीचा आहे. साहित्य संमेलन हे अभिव्यक्तीचं केंद्र असतात. तुम्हाला दुसरी अभिव्यक्ती करायचे होते तर तुम्हाला कुठेही करता येते. अभिव्यक्ती करण्याऐवजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे आणि शाईफेक करणे हे योग्य नाही अशा शब्दांत फडणवीसांनी आपली नाराजी व्यक्त केली.