सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्हा क्रीडा संकुल येथे 64 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा मंगळवार पासून रंगणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून मल्ल शाहूनगरीत दाखल झाले आहेत. दरम्यान या स्पर्धेसाठी 3 मॅट आणि 2 मातीचे असे एकूण 5 आखाडे तयार करण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू होण्यास आता अवघ्या काही तासांचाच अवधी शिल्लक राहिला आहे. मंगळवारपासून सलग चार दिवस जिल्हा क्रीडा संकुलात पैलवानांचा शड्डू घुमणार आहे. राज्यभरातून या स्पर्धेसाठी 900 मल्ल येणार आहेत.
जिल्हा क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून हि स्पर्धा पाहता यावी म्हणून प्रेक्षकांसाठी चांगली आसन व्यवस्था करण्यात आली आहे. या स्पर्धेचा जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा तसेच प्रेक्षकांनीही या स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थिती लावावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




