व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक प्रदर्शनाची तयारी पूर्णत्वाकडे; यंदाच्या प्रदर्शनाचं ‘हे’ असणार खास वैशिष्ट्य!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याच्या कृषी, औद्योगिक क्रांतीचे प्रणेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दि. २४ ते २८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत १८ वे राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाची जबाबदारी डायनॅमिक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे असून प्रदर्शनातील स्टॉल्स उभारणीचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. पाहुयात, ‘हॅलो महाराष्ट्र’ ने कृषी प्रदर्शन तयारीचा घेतलेला आढावा…

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री लोकनेते स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या संकल्पनेतून कराड येथे कृषी प्रदर्शनाला सुरूवात झाली. कराड शेती उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विद्यमाने गेली १८ वर्षे हे कृषी प्रदर्शन होत आहे. शेती उत्पन्न बाजार समितीने प्रदर्शनाची परंपरा कायम ठेवत यंदाही भव्य स्वरूपात प्रदर्शन आयोजित केले आहे.

स्वा. सै. शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केटच्या आवारात होणाऱ्या कृषी प्रदर्शनाच्या तयारीबाबत इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे राजेंद्र हेळकर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी संवाद साधला. ते म्हणाले की, या महोत्सवाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेले धान्य या ठिकाणी आणून त्यांना विक्री करता यावी, या उद्देशाने आम्ही यंदा या ठिकाणी प्रथमच धान्य महोत्सव भरवित आहोत. यंदाच्या प्रदर्शनाचे हे वैशिष्ट्य आहे.

यंदाच्या प्रदर्शनात ४०० पेक्षा अधिक विविध प्रकारचे स्टॉल्स सहभागी होणार असून यात शेतक-यांच्या कृषी माल विक्रीसाठी देखील स्टॉल उभारण्यात आलेले आहे. प्रदर्शनात ऊस, केळी, भाजीपाला पिक स्पर्धा व प्रदर्शन, विविध फळे, फुले स्पर्धा आणि प्रदर्शन तसेच पशु-पक्षी प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती डायनॅमिक इव्हेंट मॅनेजमेंटचे नरेंद्र अहिरे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.

90 टक्के स्टॉल बुकिंग…

कराड राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शन स्थळी सद्या स्टॉल बुकिंग सुरू असून या ठिकाणी 90 टक्के स्टॉल बुकिंग झाले आहेत. तरीही कोणाला स्टॉल बुकिंग करावयाचे असल्यास इव्हेंट मॅनेजमेंट टिमशी संपर्क साधावा, असे आवाहन नरेंद्र अहिरे यांनी केले आहे.

प्रदर्शनात 2 टनाचा ‘गजेंद्र’ ठरणार आकर्षण

कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनात गजेंद्र नावाचा 2 टन वजनाचा रेडा सहभागी होणार आहे. बेळगांव येथील ज्ञान देव नाईक यांचा हा रेडा असून त्याचे वजन 2 टन असल्याने त्याचे नांव त्यांनी गजेंद्र ठेवले आहे. अनेक प्रदर्शनात हा रेडा सर्वाचा कुतूहल व आकर्षणाचा विषय राहिला आहे. या रेड्याचा प्रतिदिनी 2500 ते 3000 हजार इतका खर्च असून रोज 5 किलो सफरचंद ,गव्हाचा आटा, आणि काजू चा खुराक दिला जातो. या गजेंद्र ने महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक प्रदर्शन गाजवली असून 1.5 कोटी रुपयांची मागणी या रेड्याचा आली होती. या रेड्याला बघण्यासाठी स्वंतत्र व्यवस्था केली असून गजेंद्रची सर्वानाच उत्सुकता लागून राहिली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्रदर्शन

कराड येथील कृषी प्रदर्शनास दरवर्षी लाखो शेतकरी, लोक भेटी देतात. पश्चिम महाराष्ट्रातील हे सर्वात मोठे प्रदर्शन मानले जाते. शाळा, महाविद्यालयाच्या सहली देखील प्रदर्शनाला भेट देतात. तसेच कृषी क्षेत्रात काम करणारे कृषीतज्ज्ञ देखील या ठिकाणी येऊन येथील शेतकऱ्यांच्या विविध पिकांची, शासकीय कृषी विषयक योजनांची माहिती घेतात.

कोणत्या दिवशी असणार कोणती स्पर्धा?

1) शुक्रवार, दि.२४ रोजी ऊस स्पर्धा : सर्व जातीचे वाढ्यासह, मुळासह अखंड ऊस (५ ऊसाची मोळी)

2) शनिवार, दि.२५ रोजी केळी स्पर्धा : सर्व प्रकारचे केळीघड

3) रविवार, दि.२६ रोजी फुले स्पर्धा : सर्व प्रकारची फुले, उदा. गुलाब, जरबेरा, कार्नेशन, निशिगंध, ग्लॅडीओलस, झेंडू इ.

4) सोमवार, दि.२७ रोजी फळे स्पर्धा : सर्व प्रकारची फळे उदा. आंबा, द्राक्ष, डाळिंब, सिताफळ, चिकू, आवळा, पपई, पेरू इ.

5) मंगळवार, दि.२८ रोजी भाजीपाला स्पर्धा : सर्व प्रकारची फळभाज्या व पालेभाज्या.

विजेत्या स्पर्धकांना असे असणार बक्षिस

कराड येथील कृषी प्रदर्शनात सहभागी झालेल्या व त्यातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष असे बक्षिस दिले जाणार आहे. त्यामध्ये पहिला क्र. ५००१ रुपये, दुसरा क्र. ३००१ रुपये, तिसरा क्र. २००१ रुपये असे बक्षिस दिले जाणार आहेत.