हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी संपली की राज्यात थंडी पडण्यास सुरू होते. परंतु सध्या बदलत्या वातावरणामुळे हवामान खात्याने पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील कोकण, पुणे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडेल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. याशिवाय 25 आणि 26 नोव्हेंबरला मुंबईत पावसामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईसह इतर भागात हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
या भागात पाऊस पडणार
सध्याचे वातावरण बघता पुणे परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात या भागात पाऊस हजेरी लावेल असा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबरोबर मुंबई जवळील इतर भागात देखील मध्यम सरी बरसू शकतात. इतकेच नव्हे तर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गारपीट होण्याची शक्यता
दुसऱ्या बाजूला सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, रविवारी उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी गारपीट होईल अशी दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याबरोबर , पुढील तीन ते चार दिवसात पुणे शहरांमध्ये देखील ढगाळ वातावरणासह दाट धुके राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, नाशिक, बीड, नांदेड, लातूर या भागामध्ये ही तुला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.