हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजपासून म्हणजेच 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या कालावधीमध्ये त्यांच्या हस्ते 29 नोव्हेंबर रोजी लोणावळा येथे “शालेय शिक्षण प्रणालीमध्ये योगाचे एकीकरण-विचार प्रकटीकरण” या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याचदिवशी संध्याकाळी राष्ट्रपती मुर्मू राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत आयोजित मेजवानीला उपस्थित राहतील.
यानंतर 30 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू खडकवासला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 145 व्या तुकडीच्या पासिंग आऊट परेडचे निरिक्षण करणार आहेत. यावेळीच त्यांच्या हस्ते आगामी 5 व्या बटालियनच्या इमारतीची पायाभरणी करण्यात येईल. पुढे 1 डिसेंबर रोजी द्रौपदी मुर्मू पुण्यातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाला ‘प्रेसिडेंटस् कलर’ प्रदान करणार आहेत. यानंतर महाविद्यालयात संगणकीय उपचार प्रणाली केंद्र प्रज्ञाचे उद्घाटन करतील.
द्रौपदी मुर्मू 1 डिसेंबर रोजीच नागपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन करणार आहेत. यानंतर 2 डिसेंबर रोजी राष्ट्रपती मुर्मू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 111 व्या दीक्षांत समारंभात सहभागी होणार आहेत. अशा पद्धतीने 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर कालावधीत द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्र दौरा पार पडणार आहे.