विशेष प्रतिनिधी । सत्तास्थापनेवरून भाजपा-शिवसेना यांच्यात अजूनही दिलजमाई झालेली नाही आहे. शिवसेना मुख्यमंत्री पदावर आपला दावा सोडायला तयार होताना दिसत नाही. तर भाजपा एक पाऊल मागे येऊन शिवसेनेच्या मागणीला दाद देतांना दिसत नाही आहे. अशा सर्व परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.
आज भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशिष शेलार यांचा समावेश होता. मात्र ही भेट सत्तास्थापनेसाठी नसून सत्तास्थापनेच्या कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यासाठी घेतली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. भेटीनंतर पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली. राज्यात महायुतीचं सरकार यावं म्हणून जनतेने स्पष्ट कौल दिलाय. या भेटीत राज्यपालांशी केवळ घटनात्मक पेचासंदर्भात सविस्तर चर्चा केल्याचा निर्वाळा पाटील यांनी दिला.
तेव्हा राज्यात जर भाजपा शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्यास अपयशी ठरली तर अशा परिस्थिती राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणाच्या शक्यतेला तोंड फुटले आहे. सोबतच चंद्रकांत पाटील याना सत्तास्थापन करताना राज्यपालांशी घटनात्मक बाबींवर केली असं सांगणं या गोष्टीला पुष्टी देण्यासारखे सध्या तरी दिसत आहे. तर दुसरीकडे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देणार असाल तरच फोन करा असे उद्धध्व ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. उद्धध्व यांच्या या भूमिकेवर मात्र भाजपाने मौन बाळगले आहे. दरम्यान राष्ट्रवादीने आम्हाला विरोधात बसण्यातच स्वारस्य असल्याचे स्पष्ट केले आहे. तेव्हा शिवसेना राष्ट्रवादी सोबत यांच्या शक्यता धूसर झाल्या आहेत. भाजपच्या मौनाने, शिवसेनेच्या ताठर भूमिकेमुळे आणि राष्ट्रवादीच्या विरोधात बसण्याच्या निर्णयाने राज्याची सत्तास्थापनेकडून राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल सुरु झाली आहे का अशी चर्चा आता सुरु झाली आहे.