हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोलापूरात अॅड गुणरत्न सदावर्ते यांची पत्रकार परिषद सुरु असताना एकदम राडा झाला. अचानक गोंधळ घालत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्यावर काळी शाई फेकली. या घटनेचा सदावर्ते यांनी तीव्र निषेध केला असून अशा शाईफेक हल्ल्यांनी मी घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया सदावर्ते यांनी दिली आहे.
सोलापुरात झालेल्या शाईफेकीच्या प्रकारानंतर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. पत्रकार परिषद सुरु असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केल्याचा आरोप सदावर्तेंनी केला आहे.
यावेळी ते म्हणाले, संविधान दिनी संविधानाबाबत बोलताना, छत्रपतींबाबत बोलताना अशी शाईफेक करण्यात आली. ही काळी शाई छत्रपतींच्या प्रतिमेवरही पडली. याबाबत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार हे माफी मागणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.