वंशाच्या दिव्यांना अंत्यसंस्कारापासून रोखले; मुलींनीच दिला आईला ‘खांदा’

0
114
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – देवाचे रूप असलेल्या आईला तिच्या पोटच्या गोळ्यांनीच वीस वर्षांपूर्वी घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा ‘त्या’ आईला आधार दिला, तो मुली व जावयांनी. अखेर वृद्धापकाळाने शनिवारी त्या आईने जगाचा निरोप घेतला. तिच्या अंत्यसंस्कारालादेखील तीन मुलांपैकी दोघांनी फक्त पाहुण्यांसारखी हजेरी लावल्याने, संतप्त लेकींनी त्या दोघांनाही आईच्या मृतदेहाला हात लावू दिला नाही. तिन्ही मुलींनी एका जाऊबाईच्या मदतीने खांद्यावर आईची तिरडी घेऊन स्मशानभूमी गाठत अंत्यसंस्कार केले. औरंगाबादच्या हर्सुल परिसरातील ही घटना असून चंद्रभागाबाई आनंदा साखळे (90, मूळ रा. लिहाखेडी, ता. सिल्लोड) असे निधन झालेल्या वृद्धेचे नाव आहे. त्यांना सुभद्राबाई श्रीकृष्ण टाकसाळे (रा. औरंगाबाद), सुनीता शिवाजी सोने (रा. अनवी), जिजाबाई उत्तम टाकसाळे (रा. कोटनांद्रा), तर जाऊबाई छाया शिरसाठ (रा. लिहाखेडी, ता. सिल्लोड) यांनी खांदा दिला.

पोटच्या मुलांनी चंद्रभागाबाईंना वाऱ्यावर सोडले होते. पण तरीही त्या माऊलीला आपल्या तिन्ही मुलांना भेटायची इच्छा होती. अनेक वेळा तिन्ही मुलांना फोन करूनही ते आईला बघायला फिरकले नाहीत. शेवटी मुलांच्या भेटीविनाच तिने आपले प्राण त्यागले. पोटाला चिमटा घेऊन चंद्रभागाबाईंनी तिन्ही मुलांसह मुलींना शिक्षण दिले. एक मुलगा सेवानिवृत्त कृषी अधिकारी, दुसरा उच्च न्यायालयात क्लर्क, तर तिसरा मुलगा एका खासगी कंपनीत उच्च पदावर आहे. पण या मुलांनी सुखाच्या प्रसंगात आईला आपल्यापासून दूर केले. अखेर त्या आईला मायेचा आधार मिळाला, तो औरंगाबाद शहरात राहणारी मुलगी सुभद्रा व जावई श्रीकृष्ण टाकसाळे यांचा. वृद्धापकाळात आईकडे दुर्लक्ष करणाऱ्या उच्चपदस्थ मुलांबाबत नागरिक आणि नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

आयुष्यभर काबाड कष्ट करून मुलांना मोठे केले आज ते चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत पण सख्या आईच्या म्हातारपणात, आजारपणात त्यांनी लक्ष दिले नाही. घरातून हाकलून दिले ती आजारी असताना तिला जिवंतपणी भेटायला आले नाही. इतकेच नव्हे तर मोठा मुलगा अंतिमसंस्कारासाठी ही आला नाही अशा निर्दयी मुलांबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. तर मुलगी सुभद्रा आणि जावई श्रीकृष्ण टाकसाळे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आईच्या केलेल्या सेवेसाठी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अंत्यसंस्कारावेळी माजी उपमहापौर विजय औताडे यांच्या सह परिसरातील नागरिक, नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here