डाळभात महागला सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; पहा किती झाली वाढ ?

Turdali Price
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका त्यांना बसत आहे. कारण पेट्रोल, डिझेल, वीज, भाजीपाल्या पाठोपाठ आता डाळी आणि कडधान्यांच्या किंमती ही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे जेवणासाठी साधा वरणभात करायचा का?असा प्रश्न आता गृहिणींना पडू लागला आहे. या दरवाढीमुळेस्वयंपाक घरातील बजेट मात्र कोलमडून जाणार आहे.

हंगामाच्या शेवटी तुरीला मिळणाऱ्या दराने सोयाबीनला देखील मागे टाकले असून सध्या तुरीला 8 हजार 500 क्विंटल इतका भाव मिळत आहे. उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घाऊक बाजारात तूरडाळ आजची किंमत थेट 115 रुपये किलो इतक्या दराने झाली आहे. तर किरकोळ बाजारात या किंमतीत 10 ते 20 रुपयांची वाढ झाली असून ग्राहकांना आता एक किलो तुरीसाठी 125 ते 135 रुपये मोजावे लागणार आहे.

अगोदरच पावसाळ्यामुळे हिरव्यागार भाज्यांची आवक घटली आहे. कारण अतिवृष्टीमुळे अनेक भागातील पीके पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे भाजीपाला आधीच महाग झाला आहे. तर आता याचा परिणाम डाळींवरही झाला आहे. राज्यात मराठवाडा व विदर्भात मोठ्या प्रमाणात कडधान्ये घेतली जातात. तसेच राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांतूनदेखील डाळींचा पुरवठा होतो. मात्र यंदा परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला. डिसेंबरमध्ये नवीन डाळींचे उत्पादन बाजारपेठेत येऊ शकले नसल्यामुळे बाजारपेठेत डाळींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. तूरडाळ, मूगडाळ, हरभरा डाळ, उडीद आदींच्या किमतींनी प्रतिकिलो शंभरी पार केली आहे.

आवक झाली कमी

सध्या श्रावण महिना सुरू असल्याने भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशात अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने भाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचा परिणाम भाजीपाल्यांच्या उत्पादनावर झाला आहे. भाज्यांपाठोपाठ आता डाळ आणि कडधान्यांचे दरही वाढले असून गेल्या दोन महिन्यांपूर्वी तूरडाळ ठोक बाजारात 80 रुपये किलो या दराने विकली जात होती. मात्र आता एपीएमएसीच्या ठोक बाजारात तूरडाळीचे 100 ते 115 रुपये किलोपर्यंत गेले आहेत.

मूगडाळीसाठी मोजावे लागणार इतके पैसे?

तूरडाळीपाठोपाठ मूगडाळीचे दर वधरले असून मुगाची डाळ ठोक बाजारात 95 ते 105 रुपये किलो या दराने विक्री होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात एक किलो मूगडाळीसाठी ग्राहकांना 120 ते 125 रुपये मोजावे लागत आहेत. वालाच्या दरातही वाढ झाली आहे.

साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांची चांदी

गेल्या महिन्यात तुरीचे दर हे 7 हजार 500 होते तर आता 8 हजार 500 इतके झाले आहेत. खरीप हंगामातील तुरीची काढणी होताच राज्यात नाफेडच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरु करण्यात आली होती. या खरेदी केंद्रावर तुरीला 6 हजार 300 असाच दर ठरवून देण्यात आला होता. खरेदी केंद्रावरील आणि बाजारपेठेतील दर हे सरासरीपेक्षा कमीच असल्याने शेतकऱ्यांनी तूर साठवणुकीवर भर दिला गेला होता. ज्या शेतकऱ्यांना साठा करुन ठेवला त्या शेतकऱ्यांची आता चांदी होत आहे. तब्बल 2 हजाराहून अधिकचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.