कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
‘नारी अबला नाही सबला आहे’ हे वाक्य समाजातील अनेक महिला, मुलींनी सत्यात उतरवले आहे. अगदी भारतीय सैन्यदलात प्रत्येक दिवस प्राण हातात घेऊन कर्तव्य बजावणारी महिला सुद्धा नव्या पिढीला देशसेवा अन् देशप्रेम फक्त दोन दिवसापुरते नसते याची जाणिव करून देतात. कराडची कन्या कॅप्टन प्रतिक्षा हणमंत करांडे यांनी वयाच्या अवघ्या 26 वर्षी सैन्यदलातील वर्दी चढवली. जीव ओतून कर्तव्य बजावताना त्यांच्या धाडसाचा भारतीय सैन्यदलात ‘मेजर’पदी पदोन्नतीने झालेला सन्मान कराडकरांसाठी अभिमान वाटावा असा आहे.
15 फेब्रुवारी 2023 या दिवशी राजस्थानच्या श्री गंगानगर येथे रूग्णसेवेबरोबरच देशसेवेचे कर्तव्य बजावत असलेल्या कॅप्टन प्रतिक्षा यानी स्वतःला ‘मेजर’ प्रतिक्षा म्हणून सिद्ध केले. कराडच्या विद्यानगर येथील हणमंत करांडे यांची कन्या आणि मेजर संग्राम खोत यांची पत्नी असलेल्या प्रतिक्षा चार वर्षांपुर्वी भारतीय सैन्यदलात जम्मू येथील भारतीय सैन्य दलातील चिकित्सा कोर येथे भरती झाल्या. पती मेजर संग्राम खोत यांच्या देशसेवेच्या कणखर स्वभावाने प्रतिक्षा या सुद्धा देशसेवेच्या कर्तव्याने भारावल्या. आई-वडिलांच्या संघर्षमय वाटचालीतून प्रतिक्षा यांनी एम. बी. बी. एसची पदवी मिळवली होती.
जवानांची रूग्णसेवा अन् फायरिंगमधे निष्णात
भारतीय सैन्यदलात भरती होण्यापुर्वी प्रतिक्षा कायम पती संग्राम यांची सैन्यदलातील वर्दी आपणास कशी दिसेल हे आरशात पहायच्या. अखेर त्यांनी जिवाचे रान करत घेतलेल्या मेहनतीमुळे आरशात पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरले. भारतीय सैन्य दलातील सेना चिकित्सा कोर मधे भरती झाल्यावर स्वतःची वर्दी अन् खांद्यावरील स्टार आरशात पाहताना प्रतिक्षा यांच्या डोळ्यात देशसेवेने भारावलेले अश्रू टिपकत होते. त्यांनी सैन्य दलात कॅप्टन म्हणून काम करताना अनेक बिकट प्रसंगांना तोंड दिले. त्यांच्या कर्तव्याचा पहिलाच दिवस हा 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यातील जखमी जवानांच्या रूग्णसेवेत गेला. रक्ताने माखलेले ते जवान, त्यांची जगण्याची धडपड आणि अतिरेक्यांबद्दलची चीड यातून प्रतिक्षा यांना सैन्यदलातील पहिल्या वास्तवतेला सामोरे जावे लागले. पण त्यांनी न डगमगता जखमी जवानांच्या सेवेत स्वतःला बेभान होऊन वाहून घेतले. सैन्यदलातील चिकित्सा कोरमधे देशसेवेत असताना डॉक्टर म्हणून त्यांना गळ्यात कधी टेथोस्कोप तर आणिबाणीची वेळ आलीच तर हातात एके 47 सुद्धा घ्यावी लागते.
चार वर्षांच्या संघर्षातून ‘मेजरपदी’ पदोन्नती
देशप्रेम हे फक्त व्यासपीठावर भाषण ठोकण्यापुरते नसावे तर ते सिमेवर जाऊन लढण्याची ताकद ठेवणारांना सॅल्यूट ठोकणारे असावे. प्रतिक्षा यांनी आपल्या सहा महिन्याच्या अंशिकाला घेऊन लखनौ येथील मेडिकल ऑफीसर म्हणून प्राथमिक प्रशिक्षणात कोरोना काळात स्वतःला कर्तव्यात झोकून दिले. गोंडस अंशिकाला मायेने कुशीत घ्यायची अतीव इच्छा अन् दुसरीकडे खुणावत असलेले कर्तव्य याचा मानसिक ताळमेळ लावताना ‘काळजावर दगड’ ठेवून जगणे काय असते? याचा अनूभव प्रतिक्षा यांना क्षणोक्षणी येत होता. अशा भावनिक क्षणांत स्वतःच स्वतःची समजूत काढण्याची कसरत करत प्रतिक्षा यांनी चार वर्षात ‘मेजरपदी’ झेप घेतली. चिमुकली अंशिका तीन वर्षांची कधी झाली…तिने स्वतःचे पहिले पाऊल कधी टाकले…तिचे बोबडे बोल स्पष्ट कधी झाले हे प्रत्यक्ष न पाहता फक्त मनाने अनुभवलेल्या मेजर प्रतिक्षा यांची आजही ते दिवस आठवून घालमेल होते. मेजरपदी नियुक्ती झाल्यावर आई, वडिलांच्या उपस्थितीत त्यांच्या वर्दीवरील स्टारची जागा अशोकस्तंभाने घेतली. आपल्या मुलीची संघर्षगाथा न बोलता फक्त अश्रुंनी तिचे आई, वडिल इतरांना सांगत होते. कराडकरांसाठीही हा क्षण अभिमानाचा आहे. कारण कराडात वाढलेली, शिकलेली, जगलेली आणि कराडचीच सून असलेली एक कन्या आज भारतीय सैन्यदलात मेजरपदी कार्यरत आहे. प्रतिक्षा यांची पदोन्नती एका आव्हानात्मक क्षेत्रातील आहे. या आव्हानात्मक क्षेत्रातही मुली आपली सक्षमता दाखवू शकतात हे प्रतिक्षा यांच्या वाटचालीने दाखवून दिले आहे.