कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला मजबुती मिळवून द्यायची असेल आणि २०२४ च्या निवडणुकीत पक्षाला बहुमतापर्यंत पोहोचायचे असेल तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना यंग ब्रिगेडसोबत जुन्या-जाणत्या, अनुभवी, अभ्यासू व व्हिजनरी अशी प्रतिमा असलेल्या सहकाऱ्यांचा उपयोग होऊ शकेल. त्यामुळे पक्षाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना राज्यातून राष्ट्रीय राजकारणात सक्रीय करावे. त्यासाठी त्यांना खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर संधी द्यावी, अशी मागणी पत्रकार, लेखक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी केली आहे.
यासंदर्भात डॉ. चेणगे यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सविस्तर पत्र लिहिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे, की महाराष्ट्रात आदर्श घोटाळ्यामुळे पक्षाच्या प्रतिमा प्रश्नांकित होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा पक्षाच्या आदेशावरून पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रीय राजकारणातून राज्यात आले. त्यांच्या रूपाने राज्याला निष्कलंक व चारित्र्यसंपन्न व्यक्तीमत्त्व मुख्यमंत्री म्हणून मिळाल्याने राज्यात काँग्रेसची प्रतिमा उजळून निघाली. त्यांनी राज्याला आश्वासक नेतृत्व देतानाच मुख्यमंत्री म्हणून उत्तमप्रकारे कारभार केला. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत अनेक लोकाभिमुख निर्णय झाले. महाराष्ट्रात अनेक मोठे उद्योगधंदे आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती झाली. राज्यभर अनेक विकासकामे होऊ शकली. त्यांनी राज्याची आर्थिक घडी बसवली आणि राज्याच्या विकासात भर घातली. राज्य आरोग्य, उद्योग, अर्थ, सहकार, शिक्षण, पर्यटन अशा विविध क्षेत्रात पुढे नेण्याचे काम त्यांनी केले. तत्पूर्वी चव्हाण यांनी केंद्रातही पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री म्हणून चांगले काम केले आहे. शिवाय पक्षाने त्यांच्यावर वेळोवेळी सोपवलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी पूर्ण क्षमतेने पार पाडल्या आहेत. अभ्यासपूर्ण मांडणी करून विरोधकांना उघडे पाडण्याचे व पक्षाची ध्येयधोरणे जोरकसपणे मांडण्याचे काम त्यांनी समर्थपणे केले आहे.
गेल्या सात वर्षात भाजपने उद्योगपतींना हाताशी धरून व सोशल मीडियाचा अनिर्बंध वापर करून काँग्रेसला सत्तेपासून दूर फेकून दिले आहे. देशभरात पक्षाची मोठ्या प्रमाणात पीछेहाट झाली आहे. अनेक नेते पक्षापासून दुरावले असल्याने पक्षाचे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत जनमानसात प्रतिमा उंचावण्यासाठी व पुन्हा विश्वास संपादन करण्यासाठी स्वच्छ प्रतिमा असलेल्या व भाजपसारख्या पक्षाचा सक्षमपणे प्रतिकार करू शकणाऱ्या नेतृत्वाची पक्षाला गरज आहे. त्यादृष्टीने पक्षाने पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीला बोलावून घेऊन त्यांच्या ज्ञान, अनुभव, व्यासंग, सडेतोड विचार तसेच अभ्यासपूर्ण वक्तृत्वाचा उपयोग करून घ्यावा. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत यश प्राप्त करण्यासाठी त्यांचा निश्चितपणे उपयोग होईल, असा विश्वास डॉ. चेणगे यांनी व्यक्त केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण हे देशाच्या राजकारणातील एक अभ्यासू असे व्यक्तीमत्त्व आहे. त्यांनी लोकसभा सदस्य (कराड लोकसभा मतदार संघ), राज्यसभा सदस्य, मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री म्हणून काम पाहिले आहे. तसेच पक्षाच्या विविध पदांवरदेखील त्यांनी पक्षाचे काम उत्तमरित्या केले आहे. देशाच्या विविध राज्यांमध्ये त्यांनी पक्ष निरीक्षक म्हणूनही जबाबदारी चोख बजावली आहे. राष्ट्रीय राजकारणातील जवळपास वीस वर्षाहून अधिकचा त्यांना अनुभव आहे. पक्षाला विविध राज्यात यश मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी प्रचार सभादेखील घेतल्या आहेत.
त्यांचे वडील आनंदराव चव्हाण व मातोश्री प्रेमलाताई चव्हाण या दोघांनीही यापूर्वी कराड लोकसभा मतदार संघाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व केले होते. गांधी घराण्याशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. प्रेमलाताई चव्हाण यांनी स्व. इंदिराजी गांधी यांना राजकीय ताकद मिळण्यासाठी महिला काँग्रेसची स्थापना केली होती, याचे स्मरण डॉ. चेणगे यांनी करून दिले आहे.
आज देशात महागाई, बेरोजगारीची समस्या वाढली आहे. देशाचा आर्थिक विकास दर
कमी झाला आहे. देशात एकाधिकारशाही व अराजकता वाढत चालली आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसने कार्यकर्त्यांना संघटित करून भाजपविरूध्द ताकदीने लढा दिला पाहिजे. त्यादृष्टीने पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा विचार करून त्यांना पुन्हा राष्ट्रीय राजकारणात सहभागी करून घेण्याची आवश्यकता आहे. तसे झाल्यास त्यांच्या अनुभवाचा फायदा काँग्रेस पक्षाला निश्चितपणे होईल. त्यासाठी राज्यसभा सदस्य राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पृथ्वीराज चव्हाण यांची राज्यसभा सदस्यपदी निवड करावी व त्यांच्याकडे योग्य ती जबाबदारी सोपवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.