कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड येथील शनिवार पेठेतील कोयनेश्वर मंदिर सुशोभीकरण व बंदिस्त गटर कामाचा शुभारंभ काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी “कराड शहराच्या तीन बाजूंनी कृष्णा व कोयना नदी आहे. नदीकाठचा असा निसर्ग लाभलेले शहर अन्यत्र नाही. त्यामुळेच या नदीकाठाने संरक्षक भिंत आणि परदेशातील शहरांच्या धर्तीवर वॉक वे करण्याचे आपले स्वप्न आहे. शहराच्या विकासाचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी नगरपालिका आणि आमदार यांच्यात समन्वय हवा. तो असल्यास विकास गतीने होईल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कराड येथील कोयनेश्वर मंदिर सुशोभीकरण शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, नवजवान ग्रुपचे मार्गदर्शक राजकुमार नलवडे, माजी नगरसेवक मजहर कागदी, अशोकराव पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष आप्पा माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, फारुक पटवेकर, आदींची उपस्थिती होती.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराड शहराच्या जितका विकास करता येईल तितका करण्याचा प्रयत्न केला आहे. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीचा सर्वाधिक निधी कराडला दिला. परंतु ग्रामीण भागात जितकी कामे देता आली, तितकी गतीने कामे कराड शहरात देण्यात अडचणी आल्या. नगरपालिकेकडून प्रस्ताव आले नाहीत. त्यामुळे नगरपालिका आणि आमदार यांच्यात समन्वय असल्यास विकास गतीने करता येईल.
शिवराज मोरे यांनी कृष्णा काठच्या तुलनेत कोयना नदीकाठचा विकास झालेला नसल्याचे सांगत संरक्षक भिंत, वाक वे पूर्ततेसाठी बाबांनी प्रयत्न करावेत, असे सांगितले. इरफान सय्यद यांनी कोयनेश्वर परिसरात बगीचाची निर्मिती करण्याची मागणी केली. तर मजहर कागदी यांनी, कोयनेश्वर परिसरातून महामार्गावर जाण्यासाठी पूल व्हावा, अशी मागणी केली. माजी नगरसेवक श्रीकांत मुळे यांनी स्वागत व आभार मानले.