सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यात त्याचे मोठं राजकीय पडसाद उमटले. राज्यपालांच्या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले असून त्याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यपालांवर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते साताऱ्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि त्रिवेदी यांचं म्हणणं फडणवीसांना मान्य आहे का? त्याचा निषेध त्यांनी केला आहे का? राज्यपालांना परत केंद्रात पाठवावे यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं आहे का ? तरच त्याला अर्थ आहे नाहीतर तुम्ही सुद्धा राज्यपालांच्या भूमिकेशी सहमत आहात असच महाराष्ट्राच्या जनतेला वाटेल असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटल. राज्यपालांना खरं तर परत उत्तराखंडला जायचं आहे पण मोदी काय त्यांचे ऐकत नाहीत त्यामुळे आपण काय करावं म्हणजे केंद्र आपल्याला परत बोलावेल यासाठी त्यांचा प्रयत्न चालला आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटल.
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील जत, सोलापूर आणि अक्कलकोट या गावांवर आपला दावा सांगितला आहे. त्यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, २००४ साली आपण सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला होता, त्यावर कर्नाटक सरकारने २०१४ ला प्रतिदावा ठोकत सीमाप्रश्नाचा निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही असं म्हंटल होत. आता त्याची चौकशी चालू आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत, किंवा अक्कलकोट मागितलं तरी त्याला काही अर्थ नाही. पण आपल्याला कोर्टात ताकदीने लढावं लागेल. कारण सुप्रीम कोर्टात आपला पराभव झाला तर महाराष्ट्रासाठी हा विषय संपून जाईल असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटल.