आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्तेसाठी फार्म्युला : मोदींच्या विरोधात 65 टक्के मते

Prithviraj Chavan Narendra Modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता, सरकार बदलले होते. तसेच परिवर्तन आपल्याला आता करायचे आहे, त्यासाठी एकास एक उमेदवार उभा करून, मोदींच्या विरोधातील 65 टक्के मते वाया जाऊ दिली नाहीत, तर मोदींचा पराभव शक्य आहे, असा फॉर्म्युला माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. कुंभेफळ येथील काँग्रेस सेवा दलाच्या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

आ. चव्हाण म्हणाले की, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी देशातील सर्व मोठ्या पक्षांची मोट बांधणे हेच काँग्रेस नेतृत्वापुढील मोठे आव्हान आहे. त्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी श्रीनगर येथे 30 जानेवारीला देशातील सर्व समविचारी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित केले आहे. दुसरीकडे, हे सर्व पक्ष एकत्र येऊ नयेत, यासाठी मोदींकडूनही प्रयत्न सुरू आहेत. एकूण मतदानाच्या 35 टक्के मते मोदींना मिळाल्याने ते सत्तेत आले आहेत. परंतु, 65 टक्के मते त्यांच्या विरोधात आहेत, ती मोदींचा पराभव करण्यासाठी लोकांनी टाकलेली आहेत. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ही 65 टक्के मते विविध 40 पक्षांच्या उमेदवारांमध्ये विभागली गेली आहेत. आपण एकास एक उमेदवार दिल्यास, ही सर्व मते मोदींच्या विरोधात एका पेटीत आली, तर मोदींचा पराभव करणे शक्य आहे. 1977 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी हा प्रयोग यशस्वीरीत्या राबविल्याची आठवणही त्यांनी काढली. महाविकास आघाडीत एकमत होताना दिसत नाही. याबद्दल त्यांना विचारले असता, हे मी लोकसभा निवडणुकीपुरते बोललो आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय हा अध्यक्ष घेतील.

महाराष्ट्रात दृष्टी नसलेले नेतृत्व आलेले आहे. सरकार हायजॅक केलेले आहे, हे कॅश अँड कॅरी सरकार आहे. पैसे द्या आणि निर्णय घ्या आणि त्यामुळेच महाराष्ट्रात खोके, खोके झाले आहे. सर्वोच्च न्यायालयात तारीख प्रलंबित असल्याने सरकारचा विस्तारही होऊ शकत नाही. 23 मंत्री अपेक्षित आहेत, कधी न्यायालयाचा निर्णय लागतो, माझ्या पदरात काही पडते का, कॅबिनेट पाहिजे, चांगले खाते पाहिजे, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये किती सुसंवाद आहे, ते महाराष्ट्र पाहतोय, अशी टीका चव्हाण यांनी केली.