सातारा | सातारा जिल्ह्यात वाढत्या खासगी सावकरी प्रकरणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लक्ष घातले असून जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी याबाबत कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी जिल्ह्यात 7 दिवसात 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील खासगी सावकारी जोमात असून अजूनही बडे मासे पकडणे गरजेचे आहे.
सातारा जिल्हयात अवैध सावकारी व्यवसाय करणारे इसमांचे विरुध्द 22 जानेवारी 2022 रोजी पासून अवैध सावकारी विरुध्द विशेष मोहिम राबवून कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखा सातारा व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या आहेत. त्याप्रमाणे जिल्हा पोलीस दलातर्फे 22 जानेवारी 2022 रोजी पासून 28 जानेवरी 2022 पर्यंत विशेष मोहिम राबवुन सातारा जिल्हयामध्ये अवैध सावकारी व्यवसाय करणा-या सावकारांविषयी गोपनीय माहिती प्राप्त करुन, अवैध सावकारांच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडीतांच्या तक्रारी घेवुन महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अंतर्गत एकूण 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अवैध सावकारांच्या कारवाईची मोहिम यापुढे देखील सुरुच राहणार असून ज्या नागरीकांना बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणारांकडुन त्रास होत आहे. अशा तक्रारदारांनी संबंधीत पोलीस ठाणेस त्यांचे विरुद्ध तक्रार दाखल करावी जेणे करुन अवैध सावकारी व्यवसायाचे समूळ उच्चाटण करता येईल, असे आवाहन अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयातील नागरीकांना केले आहे.