औरंगाबाद – आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसात संप पुकारल्याने खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास खुद्द शासनानेच परवानगी दिली आहे. मात्र, त्यांच्याकडून किती भाडे आकारण्यात येत आहे. याकडे यंत्रणा दुर्लक्ष करत आहे त्यामुळे खासगी वाहतूकदार मनमानी भाडे आकारून प्रवाशांच्या खिशावर एक प्रकारे दरोडा टाकत आहेत.
औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बस स्थानक तसेच सिडको बस स्थानक परिसरात खाजगी वाहतूकदारांचा अक्षरशा बाजार भरल्याचे अनुभूती सध्या प्रवाशांना येत आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी मध्यवर्ती बसस्थानकात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले, तसेच जागरण गोंधळ घालूनही शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तोच सिडको बस स्थानकात एसटी कर्मचाऱ्यांनी मुंडन करीत जागरण गोंधळ घातला. शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. सामान्य प्रवाशांना बसत आहे संपाचा फायदा घेत बस स्थानक परिसरात खासगी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मिळालेल्या संधीचा फायदा घेत खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्यात येत आहे. परंतु राज्य शासनानेच खाजगी वाहतूकदारांना बस स्थानकातून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिल्याने एक प्रकारे राज्य सरकार खाजगी वाहतूकदारांना पाठीशी घालत असल्याचे यावरून दिसत आहे. खासगी वाहतूकदार मनमानी भाडे आकारून प्रवाशांच्या खिशावर दरोडा टाकत आहेत. याकडे संबंधित यंत्रणेचे मात्र सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.