मुंबई | काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेत आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी घोषित झाली आहे. चंद्रकांत खैरे आणि दिवाकर रावते या ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेत्यांना डावलण्यात आल्याने शिवसेनेत नाराजी पसरली आहे.
याबाबत प्रतिक्रिया देतांना चंद्रकांत खैरे म्हणाले की – पक्षात जुन्या नेत्यांचीही गरज असते; संधी मिळाली असती तर बळ मिळाले असते. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत खैरे यांचा पराभव झाला होता. मात्र, औरंगाबादमध्ये अजूनही खैरे यांचा प्रभाव आहे यामुळे औरंगाबाद पालिका निवडणुका आणि एमआयएमच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर खैरेंना शिवसेना राज्यसभेत पाठवेल, असा अंदाज होता. खैरेंपाठोपाठ दिवाकर रावते, शिवाजीराव आढळराव पाटील आणि अनंत गीते यांचीही नावे चर्चेत होती. .
राज्यसभेच्या एका जागेसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते चंद्रकांत खैरे आणि दिवाकर रावते यांच्या नावांसोबत प्रियंकाचेही नाव चर्चेत होते पण ते फार मागे होते. मात्र, तिकीटवाटपाच्या निर्णयात प्रियंकाने बाजी मारली.
प्रियंका यांचे हिंदी आणि इंग्रजीवर प्रभुत्व आहे. त्या दिल्लीत शिवसेनेची भूमिका प्रभावीपणे मांडू शकतात. त्यानिमित्त शिवसेनेला राष्ट्रीय राजकारणात दबदबा निर्माण करता येईल, या व्यूहरचनेतून शिवसेनेने चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली असे पक्षातर्फे समर्थन करण्यात येते आहे. राज्यसभेची निवडणूक २६ मार्च रोजी होणार आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News