कराड। पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भुयाचीवाडी (ता. कराड) गावाच्या हद्दीत माई मंगलम कार्यालयासमोर साताराकडून कराड दिशेने जाणाऱ्या मार्गावर दुधाच्या टँकरच्या धडकेने शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (दि. 28) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील दूधाच्या टँकरच्या चालकाने घटनास्थळावरून पलायन केले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अपशिंगे (ता. सातारा) येथील ज्युनिअर काॅलेजवर शिक्षक असलेले समाधान गंडू कांबळे (वय- 42, मूळ राहणार- सोलापूर, सध्या रा. उंब्रज, ता. कराड) यांचा अपघाता मृत्यू झाला. युनिकॉर्न गाडी क्रमांक (MH- 50- R- 7711) या दुचाकी गाडीस दूधाच्या टॅकरने धडक दिली. या दुचाकी- दूधाच्या टॅंकर अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक खोळंबली.
घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले. या घटनेमुळे दूधाचा टॅंकर चालक वाहन सोडून पळून गेला. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद उंब्रज पोलिस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते.