बळीराजा शेतकरी संघटनेकडून पोलिस प्रशासनाचा निषेध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे नेते खा. शरद पवार कराड येथे आले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना भेटायचे होते. पण पोलीस प्रशासनाने भेटून न दिल्याने बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पोलिस प्रशासनाचा निषेध करत असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी सांगितले.

याबाबत दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे की, सध्या शेतकरी अनेक संकटांना सामोरे जात आहे. अतिवृष्टीने शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. सरकारने 150 रुपये प्रति गुंठा मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. एकिकडे शेती पंपाची विज कनेक्शन बंद करण्याचे आदेश सरकारने महावितरणला दिले आहेत. तर दुसरीकडे अतिवृष्टीत तुटपुंजी मदत व शेतीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित करायचा सरकारचा आदेश. यामुळे शेतकरी पुरता हवालदील झाला आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार पन्नास हजार अनुदान देणार होते. त्याबाबत चर्चा करायची होती.

एक रकमी एफआरपी असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही शरद पवार यांना भेटणार होतो. यासाठी पोलिस प्रशासनाकडे शरद पवार यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. परंतु, पोलिसांनी भेट नाकारली. शेतकरी नेत्यांनी नुसती आंदोलने करून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे का? लोकशाही मार्गाने प्रश्न मांडायचे नाहीत का? शरद पवार कराडमध्ये असताना तुम्ही महाबळेश्वर येथे भेट होईल, असे सांगण्यात आले. असे असले तरीही आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतच राहणार आहे, असेही साजिद मुल्ला यांनी पत्रकात म्हटले आहे.