सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
मुंबई येथील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर एस टी कर्मचाऱ्यांनी चप्पल व दगडफेक केली. या संपूर्ण परिस्थितीला आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या दयनीय स्थितीला शरद पवारांना जबाबदार धरत एस टी कर्मचाऱ्यांनी केलेल्या या हल्ल्याचे संपूर्ण राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने या हल्ल्याच्या निषेधार्थ जागोजागी निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला.
माण तालुक्यातील दहिवडी या ठिकाणीही राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध मोर्चा काढत सदर घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी एक निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. हे निवेदन निवासी नायब तहसीलदार शैलेश व्हट्टे यांनी स्वीकारले.
यावेळी बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले, काल मुंबईमध्ये घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. देशाच्या महत्वाच्या पदांवर काम केलेल्या आणि सर्वांना पवार साहेबांच्या कामातील सोज्वळपणा माहित असताना खा. शरद पवारांवर न्यायालायच्या निर्णयाचे खापर फोडत त्यांच्या बंगल्यावर झालेला चप्पल आणि दगडफेकीचा प्रकार अत्यंत घृणास्पद असून संपूर्ण राष्ट्रवादी आणि माण तालुका सर्व टीम या घटनेचा निषेध व्यक्त करते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख, माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, दहिवडी नगराध्यक्ष सागर पोळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे, नगरसेवक महेश जाधव, नगरसेवक विशाल पोळ, नगरसेवक सुरेंद्र मोरे, स्वीकृत नगरसेविका नीलिमा पोळ, नगरसेविका मोनिका गुंडगे, स्वीकृत नगरसेवक शामराव नाळे, प्रा. कविता म्हेत्रे, लालासाहेब ढवाण, अजित चव्हाण, वैभव जाधव, साईनाथ जाधव आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक, कार्यकर्ते पदाधिकारी व जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.