औरंगाबाद : औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. देशभरासह इतर देशातीलही पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी व मूलभूत विकास कामासाठी निधी द्या अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिल्लीत पर्यटन मंत्री व अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली आहे.
चंद्रकांत खैरे यांनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्री किशन रेड्डी, राज्यमंत्री अर्जुनराम मेघावाल, पर्यटन सचिव राघवेंद्र सिंग, भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालक व्हि. विद्यावती यांची भेट घेत पर्यटन वाढीसासाठीच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील महामार्ग सोबतच वेगवेगळ्या कामांचा पाठपुरावा केला आणि त्याला गती देण्याची ही विनंती केली. त्याचबरोबर चंद्रकांत खैरे यांनी दिलेल्या निवेदनात बीबीका मकबरा, देवगिरी किल्ला, अजिंठा, वेरूळ येथे रोप – वे, लाईट अँड साऊंड शो या सर्व बाबी पर्यटन विकास योजनेत नमूद केल्या आहे.
औरंगाबादेतील पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता बीबी का मकबरा, अजिंठा-वेरूळ लेणी या ठिकाणी जगभरातील पर्यटकांनी भेट द्यावी म्हणून येथे जागतिक स्तरावर सुविधा देणे गरजेचे आहे. वर नमूद केलेल्या बाबी सुरु करण्यात आल्या तर पर्यटक आर्कर्षित होतील. त्याचबरोबर हे प्रकल्प इथे उभारणे गरजे असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी पर्यटन मंत्री आणि त्या विभागाच्या निदर्शनास आणून देत वरील मागण्या व त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.