कराड | वडिलांच्या निधनाचे दुःख विसरून कठोर परिश्रमातून आकाशीने पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाला गवसणी घातली. कोळे येथील आकाशी अरुण चव्हाण हिने मुलींमध्ये राज्यात 12 वा क्रमांक मिळविला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा तोंडावर असताना 2019 साली वडिलांचे अपघाती निधन झाले. तरीही आकाशी हिने जिद्द सोडली नाही. वडिलांच्या निधनाचे दुःख विसरून कठोर परिश्रमाच्या बळावर आकाशीने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. मुलींमध्ये राज्यात बाराव्या रँकने पास झालेल्या कराड तालुक्यातील कोळे येथील आकाशी अरुण चव्हाण या जिद्दी मुलीनं पोलीस उपनिरीक्षक होत नव्या पिढीपुढे आदर्श निर्माण केला.
मूळचाच कौटुंबिक शैक्षणिक वारसा असलेली आकाशी चव्हाण प्रथम पासूनच काहीतरी वेगळं करण्याच्या दृष्टीने जिद्दीने आणि चिकाटीने मेहनत करत होती. आयुष्यात संकटही येत असतात या संकटावर मात करत पुढे कसे जायचे हे आकाशीने या परीक्षेत दाखवून दिले. परीक्षा दोन महिने पुढे असतानाच वडिलांचे अपघाती निधन झाले. पितृछत्र हरवले आणि संपूर्ण जबाबदारी प्राथमिक शिक्षिका असलेल्या आई शोभा चव्हाण यांच्यावर पडली. बहीण पुनम चव्हाण, तेजस्वी चव्हाण, भाऊ शंभूराज यांनी आकाशीचा आत्मविश्वास वाढवला. तिच्याकडून स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली, नुकत्याच हाती आलेल्या निकालात पोलीस उपनिरीक्षक पदाला तिने गवसणी घातली आहे.
आकाशीचे प्राथमिक शिक्षण आजोळी येरवळे येथे झाले आहे. माध्यमिक शिक्षण आदर्श विद्या मंदिर विंग तर महाविद्यालयीन शिक्षण कराडच्या सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात पार पडले आहे. त्यानंतर इंजिनियर पदवी प्राप्त करून तिने स्पर्धा परीक्षा दिली. आणि त्यात तीने उत्तुंग यश मिळवलं.
आकाशीला युवा अकॅडमी सातारा येथील विश्वास मोरे यांच्याकडून मैदानीचे मार्गदर्शन मिळाले. तिच्या यशात आजोबा कै. रामचंद्र यादव व आजीचे मार्गदर्शन लाभले. आकाशीने जिद्दीने व कठोर परिश्रमाने मिळवलेल्या या यशाबद्दल येरवळे कोळे तसेच परिसरातून तिचे अभिनंदन होत आहे