काँग्रेसच्या हातून आणखी एक राज्य निसटलं; पुदुच्चेरी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुदुच्चेरी ।  विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्यानंतर व्ही नारायणसामी सरकार कोसळलंय. यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी आपला राजीनामा नायब राज्यपालांकडे सोपवला आहे. यापूर्वी सकाळी विधानसभेत पोहोचण्यापूर्वी व्ही. नारायणसामी यांनी त्यांच्याकडे बहुमत असल्याचा दावा केला होता. परंतु सदनात त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही.

यापूर्वी पुदुच्चेरीचे नवनियुक्त उपराज्यपाल तमिलिसाई सौदरराजन यांनी मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, काँग्रेसचे आमदार के लक्ष्मीनारायण आणि द्रमुखचे आमदार व्यंकटेशन यांनी रविवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ३३ सदस्यीय विधानसभेत काँग्रेस-द्रमुक आघाडीच्या आमदारांची संख्या ११ झाली. तर विरोधीपक्षांचे सध्या १४ आमदार आहेत.

पुदुच्चेरीच्या राज्यपालांनी सरकारला सोमवारी संध्याकाळपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं होतं. पुडुचेरी विधानसभेत ३३ जागा आहेत. यापैकी ३० सदस्यांची निवड ही निवडणूक प्रक्रियेतून होते, तर उर्वरित ३ सदस्यांची निवड केंद्र सरकारतर्फे केली जाते. २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसनं १५ जागांवर विजय मिळवला होता. तर द्रमुकच्या ३ आमदारांनी काँग्रेसला समर्थन दिलं होतं. यापैकी एका आमदारानं रविवारी आपला राजीनामा दिला.

आतापर्यंत एकूण ५ आमदारांनी आपला राजीनामा दिला होता. त्यानंतर नारायणसामी सरकार संकटात आलं होतं. उल्लेखनीय म्हणजे, येत्या काही महिन्यांत (एप्रिल-मेमध्ये) पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या चार राज्यांसोबतच पुदुच्चेरीमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधीच व्ही नारायणसामी सरकार कोसळलंय.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.