सुरक्षा दलांनी ‘असा’ उधळला पुलावामधील दहशतवादी हल्ल्याचा कट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुलवामा । सुरक्षा दलाच्या दक्षतेमुळे पुलवामामध्ये पुन्हा एकदा आत्मघातकी दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट उधळून लावला गेला आहे. आज सकाळी पुलवामा जिल्ह्यात सुरक्षादलानं आयईडी भरलेली एक सॅन्ट्रो कार पकडली होती. या गाडीत ४०-४५ किलो स्फोटकं असल्याची शक्यता काश्मीर पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी व्यक्त केली. ही कारवाई कशी करण्यात आली त्याचीही माहिती त्यांनी दिली. विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी कटात ‘जैश ए मोहम्मद’चा हात होता. यात ‘हिजबुल मुजाहिद्दीन’नंही मदत पुरविली होती. परंतु, पुलवामामध्ये तैनात पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या मदतीनं ही दहशतवादी कारवाई होण्याआधीच रोखण्यात सुरक्षा दलाला यश आलं.

गेल्या आठवड्याभरापासून या कारवाईबद्दल आम्हाला इनपूटस मिळत होते. जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मिळून आत्मघातकी हल्ल्याचा कट रचत आहेत, असं समजलं होतं. यानंतर सगळ्या यंत्रणा सावध झाल्या होत्या. काल सायंकाळी ठोस माहिती हाती लागली आणि सायंकाळी पुलवामा पोलीस, सीआरपीएफ, सेनेनं कारला ट्रॅक करून जागेचा थांगपत्ता लावला.

नाक्यावर या कारला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी सुरक्षा दलानं वॉर्निंग फायरही केले. त्यानंतर मात्र घाबरलेल्या दहशतवादी गाडी उलट दिशेने फिरवून पळण्याचा प्रयत्न करू लागले. त्यानंतर त्यांना दुसऱ्यांदा वॉर्निंग देण्यात आली. परंतु, चार दहशतवादी कार तिथंच टाकून सुरक्षा यंत्रणेला चुकवून फरार झाले.

या गाडीत स्फोटकं भरलेली असल्यानं पोलिसांनी सकाळपर्यंत वाट पाहिली. त्यानंतर सकाळी डिफ्युजल टीम घटनास्थळी आल्यानंतर स्फोटकांचा तपास लावण्यात आला. गाडीचे-स्फोटकांचे व्हिडिओ, फोटो घेऊन स्फोटकं सुरक्षितरित्या डिफ्युज करण्यात आले, असं पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी म्हटलंय. सुरुवातीला या गाडीत २५ किलो स्फोटकं असू शकतील, अशी माहिती समजली होती. परंतु, डिफ्युज करताना ज्या पद्धतीने स्फोट झाला आणि त्याचा मलबा ५० मीटरपर्यंत उंच उडाला त्यावरून या गाडीत ४०-४५ किलो स्फोटकं असल्याचं लक्षात येतंय, असंही त्यांनी म्हटलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment