पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.यामध्ये बारावीत शिकणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील हॉर्स रायडर मुलीने आत्महत्या केली आहे. या मुलीने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली आहे. पुणे जिल्ह्यात सिंहगड रस्त्यावरील नांदेड भागात ही घटना घडली आहे. या मुलीने आत्महत्या का केली हे अजून समजू शकले नाही.
मुलगी खाली पडल्याचा शेजाऱ्यांना आवाज आला
हावीला तब्बल 95 टक्के गुण मिळवून यशस्वी झालेल्या आणि सध्या बारावी इयत्तेत शिकत असलेल्या नॅशनल हॉर्स रायडरने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अजून समजू शकले नाही. रविवारी सकाळी अचानक 9 वाजताच्या सुमारास गॅलरीत व्यायाम करणाऱ्या शेजाऱ्यांना काहीतरी जोरात खाली पडल्याचा आवाज आला. तेव्हा त्यांनी खाली पाहिलं असता त्यांच्या मुलीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी पडली असल्याचं दिसून आलं. यानंतर त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली.
बालपणीपासून घोडेस्वारीचे धडे
हाती आलेल्या माहितीनुसार, मयत विद्यार्थिनी ही अत्यंत गुणी मुलगी होती. तसेच तिच्या घरातील वातावरणही खेळीमेळीचे होते.तिच्या वडिलांची हॉर्स रायडिंगची ॲकॅडमी आहे. याच ॲकॅडमीमध्ये ती बालपणीपासून घोडेस्वारीचे धडे घेत होती. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तिने हॉर्स रायडिंगमध्ये अनेक पारितोषिके पटकावली आहेत. एवढे सगळे ठीक असताना तिने इतके टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास पोलीस करत आहेत.