जुन्नर : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन जणांनी घरात शिरून 20 वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. या आरोपी नराधमांनी घरात घुसून मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर बलात्कार केला आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अशोक हरिभाऊ बनोटे, संदीप भिवसेन सूर्यवंशी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पीडित मुलगी घरी एकटी होती. यावेळी आरोपी त्या ठिकाणी आले व त्यांनी पीडितेच्या घरात घुसून पीडितेला मारहाण करून कापडाने तिचे हातपाय, तोंड बांधून दोन्ही नराधमांनी आळीपाळीनं या मुलीवर बलात्कार केला. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये आळेफाटा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पीडितेच्या आईने दिलेल्या वर्णनाप्रमाणे फरार आरोपी यांचा तांत्रिक व शास्त्रोक्त पद्धतीने तपास करून पुणे ग्रामीणचे पोलिसांनी अटक केली आहे.पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अशोक हरिभाऊ बनोटे व संदीप भिवसेन सूर्यवंशी या दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या दोन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.