पुण्यात बोगस लष्कर भरती रॅकेटचा पर्दाफाश; सैन्यात नोकरीचे आमिष देत तरुणांकडून लाखों रुपये उकळले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । पुण्यामध्ये लष्कर भरतीतील रॅकेटचा लष्कर गुप्तचर आणि पुणे शहर गुन्हे शाखेने कारवाई करत पर्दाफाश केला आहे. वानवडी येथील लष्करी प्रशिक्षण संस्था (एआयपीटी) येथे झालेल्या लष्करातील भरतीच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे आमिष दाखवून तरुणांकडून लाखो रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या सहकार्याने टोळीला अटक केली आहे.

अटक केलेल्या आरोपींमध्ये लष्कराच्या भरती कार्यालयातील कर्मचाऱ्याचाही सहभाग आहे. (Army Recruitment Racket). वेनसिंग लालासिंग रावत (वय 45), रवींद्र राठोड असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर जयदेव सिंह परिहार हा लष्करी भरती कार्यालयातील कर्मचारी आहे. याप्रकरणी अक्षय साळुंखे या तरुणाने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी येथील ‘एआयपीटी’ या संस्थेत रविवारी सैन्य भरतीसाठीची लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला बसणाऱ्या काही तरुणांना परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जात असल्याची खबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार, गुन्हे शाखेचे युनिट दोन आणि युनिट पाच अशी दोन पथके आणि लष्करी गुप्तचर विभागाचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई करुन शनिवारी रात्री रावत आणि राठोड यांना ताब्यात घेतले (Army Recruitment Racket).

लष्करी गुप्तचर विभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे विचारपूस केली, त्यावेळी त्यांनी रविवारी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी 19 मुलांशी संपर्क साधला होता. रावत याने ‘लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपली ओळख असून मी तुम्हाला लेखी परीक्षेत उत्तीर्ण करतो’, असे तरुणांना सांगितले होते. तसेच काम झाल्यानंतर त्याने प्रत्येकी १ ते २ लाख रुपयांची तरुणांकडे मागणी केली होती. त्यासाठी त्याने तरुणांकडून त्यांची मूळ कागदपत्रे ताब्यात घेतली होती.

संबंधित 19 मुलांना पंधरा दिवसांपासून लोहगाव येथे एकत्र आणून एका शिक्षकाची नेमणूक करुन त्यांचे वर्ग घेतले जात होते. स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आणि क्षमतेवर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांकडूनच ‘मी तुम्हाला लेखी परीक्षेत उत्तीर्ण केले,’ असे सांगून निवड झालेल्या तरुणांना ठरलेली रक्कम दिल्यानंतरच त्यांची मूळ कागदपत्रे परत देण्यात येतील, असं राठोड याने या मुलांना सांगितल होतं.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in