पुणे- बेंगलोर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एका युवकाचा मृत्यू झाला आहे. अमोल सदाशिव लोकरे (वय- 36, रा. येरवळे, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड ते कोल्हापूर या लेनवर जखिनवाडी फाट्याजवळ शुक्रवारी दि. 18 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दुचाकी व अज्ञात वाहनाचा अपघात झाला. अपघातात येरवळे येथील अमोल सदाशिव लोकरे हा युवक गंभीर जखमी झाला. जखमी अमोल याला हायवे 108 ॲम्ब्युलने त्याला तात्काळ कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना अमोल यांचे निधन झाले. या घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे अपघात विभागाचे पोलिस कर्मचारी प्रशांत जाधव, चालक लादे घटनास्थळी रवाना झाले. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली होती. घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस कर्मचारी प्रशांत जाधव करीत आहेत.