Sunday, June 4, 2023

अजित पवार Action Mode मध्ये ! पुण्यातील पहिल्या ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन’ सेंटरचे उदघाटन, तिसऱ्या लाटेचीही तयारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. राज्यात तीव्र लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुणे शहरातही लसीकरण मोहीम प्रभावीपणे हाताळली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील हडपसर येथील पहिल्या ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटरचे ऑनलाईन उदघाटन केले. यावेळी पुणे जिल्हा लसीकरणात आघाडीवर आहे. हडपसरमधील ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांसाठी सुलभ सेवा देणारे ठरेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणले , “पावसाळ्यात कोरोना सोबत इतर संसर्गजन्य आजार वाढणार नाहीत, याबाबत दक्ष राहण्याची गरज आहे. आपण सर्वांनी एकजुटीनं कोरोना संकटाचा सामना करायचा आहे. कोरोनाला हरवण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचं नागरिकांनी काटेकोरपणे पालन करा.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आपण यशस्वीपणे सामना करत आहोत. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत कोणत्याही परिस्थितीत बेसावध राहून चालणार नाही. राज्य शासनानं तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत बालरोग तज्ज्ञांचाही टास्क फोर्स तयार केला आहे”.

सरकार लसीकरणासाठी कटिबद्ध

परदेशातून लस खरेदी करण्याचीही शासनाची तयारी आहे. लस उत्पादक ‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीनं जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तिथे लवकरच लसीचं उत्पादन सुरू होईल. या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगानं पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे.
कोरोना प्रतिबंधक लस अधिकाधिक संख्येत उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.प्रत्येक पात्र नागरिकाला लस देण्यास राज्य सरकार कटीबध्द आहे.राज्यासह पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होतेय; तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत खबरदारी घेण्याची गरज असल्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.