पुणे मेट्रोने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवासी संख्या वाढविण्यासाठी ‘ई-बाईक’ सेवा सुरू केली आहे. ही सेवा ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’ने ‘टीएस स्विच ई-राइड प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीसोबत करार करून सुरू केली आहे. मेट्रो प्रवासानंतर अपेक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी ही सेवा प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती महामेट्रोने दिली.
मेट्रो प्रवासाला चांगला प्रतिसाद
‘पुणे मेट्रो’च्या ३३.२ किलोमीटर अंतराच्या प्रवासाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. सध्या दीड लाखांपेक्षा अधिक प्रवासी दररोज मेट्रोने प्रवास करतात. भविष्यात प्रवासी संख्या आणखी वाढण्याच्या उद्देशाने महामेट्रोने ई-बाईक सेवा सुरू केली आहे. मेट्रोने प्रवास करून उतरल्यानंतर प्रवासी त्याच ठिकाणाहून माघारी परतण्यासाठी ई-बाईकचा माफक दराने लाभ घेऊ शकतात. प्रारंभी दहा मेट्रो स्थानकांवर ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. या सेवेसाठी ‘स्विच ई-राइड’ या ब्रँडच्या नावाने ५० ई-बाईकचा वापर होणार आहे.
सेवा कशी मिळवायची?
मेट्रो प्रवाशांना या सेवेसाठी मोबाइल अॅप डाउनलोड करावे लागेल. त्यामध्ये सरकारी ओळखपत्र किंवा निवासी पुरावा, तसेच वीज बिलाची नोंदणी आवश्यक आहे. सुरक्षिततेसाठी लाइव्ह ट्रॅकिंग, ग्राहक सेवा आणि जिओ-फेन्सिंग यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.दहा मेट्रो स्थानकांवर बॅटरी चार्जिंग केंद्रे उपलब्ध असून, या स्थानकांमध्ये पीसीएमसी, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, दापोडी, शिवाजीनगर, मंडई, स्वारगेट, रुबी हॉल क्लिनिक, आनंदनगर, आणि वनाझ यांचा समावेश आहे.
ई-बाईकचे दर
१ तास: ५५ रुपये
४ तास: २०० रुपये
६ तास: ३०५ रुपये
२४ तास: ४५० रुपये
ई-बाईकची वैशिष्ट्ये
एका वेळी दोन प्रवाशांचे (१५० किलो) वहन
पाच मिनिटांत जलद बॅटरी चार्जिंग
एका चार्जमध्ये ८० किलोमीटर प्रवास
ई-बाईक बंद पडल्यास अॅपवर ‘एसओएस’ बटन
मोबाइल अॅपद्वारे ई-बाईक सुरू आणि बंद करण्याची सुविधा




