Pune Railway : पुण्यात सुरु होणार नवा रेल्वेमार्ग; 25 वर्षे रखडलेला प्रकल्प प्रत्यक्षात उतरणार

Pune Railway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणेकरांसाठी आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी (Pune Railway) आनंदाची बातमी आहे. बारामती-फलटण-लोणंद रेल्वेमार्ग (Baramati-Phaltan-Lonand Railway) आता प्रत्यक्षात उतरणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता. आता मात्र मार्गासाठी निविदाही प्रसिद्ध झाली आहे. तसेच भूसंपादनाचे कामही 78 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता तरी पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बारामती- फलटण- लोणंद या रेल्वेमार्गाला (Pune Railway) 1997-1998 च्या रेल्वे अर्थसंकल्पातच रेल्वे विभागाने मंजुरी दिली होती. मात्र प्रत्यक्षात या रेल्वे मार्गासाठीचे भूसंपादन सुरु व्हायला वीस वर्षांपेक्षा जास्त काळ लागला. फलटण-लोणंद हे भूसंपादन होऊन तेथे रेल्वे मार्गही अस्तित्वात आला. बारामती-फलटण हे भूसंपादन रखडले होते. आता मात्र बारामती-फलटण-लोणंद रेल्वेमार्ग प्रत्यक्षात दिसणार आहे. याचे कारण म्हणजे या मार्गासाठी आता 78 टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे.

2025 पर्यंत रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होणार- Pune Railway

आगामी 2 वर्षात बारामती- फलटण- लोणंद हा रेल्वे मार्ग उभारण्याचे रेल्वे मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे. या रेल्वे मार्गासाठी प्रत्येकी 300 कोटी रुपयांच्या दोन अशा 600 कोटी रुपयांच्या निविदा प्रसिध्द झाल्या आहेत. डिसेंबर 2025 पर्यंत हे काम संपविण्याचा रेल्वे विभागाचा प्रयत्न असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली.

बारामती-फलटण-लोणंद रेल्वे मार्ग झाल्यानंतर प्रवासाचे अंतर कमी होण्यास मदत होईल तसेच इंधन बचतही होईल. हा रेल्वे मार्ग वेगाने पूर्ण होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी सातत्याने रेल्वे विभाग, राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. अखेर तब्बल २५ वर्षांनी हा रेल्वेमार्ग आता प्रत्यक्ष उतरेल आणि पुणेकरांचे स्वप्न साकार होईल.