पुणे । पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश प्राप्त झालं आहे. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे-नागपूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेत. हा भाजपाला मोठा धक्का समजला जात आहे. तर औरंगाबाद मतदार संघातही महाविकास आघाडीने विजय मिळवला. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चिमटा काढला आहे.
”चंद्रकांत पाटील यांचा विनोदी विधान करणाचा लौकिक आहे. मागच्यावेळी आमच्यामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार होते त्यामुळे ते विजयी झाले. यावेळी त्यांना अंदाज होता म्हणून त्यांनी पुणे शहरातील त्यांच्या दृष्टीनं सोयीचा मतदारसंघ निवडला. चंद्रकांत पाटील यांना विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ बदलला नसता”, असा टोला शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला महत्व देण्याची गरज नसल्याचंही पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले. (Sharad Pawar on mahavikas aghadi win)
पुणे आणि नागपूर पदवीधरची जागा गमावल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर एकएकटे लढा असं आव्हान महाविकास आघाडीतील घटकपक्षांना केलं आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचं खच्चीकरण झालंय. तर राष्ट्रवादीने आपली संघटना मजबूत केली आहे, असं वक्तव्य करत त्यांनी शिवसेनेला एकप्रकारे सूचक इशाराच दिलाय. तर पुण्यात आणि नागपुरात अपक्ष उमेदवाराने अजून काही मतं घेतली असती तर विजय आमचाच होता, असं म्हणत पाटील यांनी आपला पराभव मान्य केला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’