पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये भारतीय सैन्य दलातील एका 24 वर्षीय जवानाने पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या आयुष्याचा शेवट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण ?
गोरख नानाभाऊ शेलार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गोरख शेलार यांनी 6 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. गोरख हे सैन्य दलामध्ये भरती नर्सिंग असिस्टंट पदावर एएफएमसीमध्ये कार्यरत होते. गोरख शेलार यांनी पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले आहे. गोरख शेलार यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांच्या पत्नीसह एकूण पाच जणांवर पुण्यातील वानवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरख यांची पत्नी अश्वीनी पाटील, युवराज पाटील, संगिता पाटील, योगेश पाटील, भाग्यश्री पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
गोरख यांच्या भावाने केला गंभीर आरोप
या आत्महत्येप्रकरणी गोरख शेलार यांचे भाऊ केशव यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 16 फेब्रुवारी 2021 रोजी माझ्या भावाचं लग्न झालं होतं. लग्न झाल्यापासून माझ्या भावाची पत्नी अश्विनी युवराज पाटील हिने 6 फेब्रुवारी 2022 पर्यंत माझा भाऊ गोरख शेलार याला वारंवार मानसिक त्रास दिला. तुझी नोकरी घालवतो, गरोदर पत्नीचा गर्भपात करतो आणि तुझ्यासह तुझ्या कुटुंबावर गुन्हा दाखल करतो. नाहीतर सोडचिठ्ठी दे आणि 15 लाख रुपये दे असे वारंवार बोलून माझा भाऊ गोरख शेलार याला वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून गोरख याने आत्महत्या केली असे केशव यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. माझ्या भावाच्या मृत्यूला भावाची पत्नी अश्विनी, सासरा युवराज पाटील, सासू संगिता पाटील, मेव्हणा योगेश पाटील, मेव्हणी भाग्यश्री पाटील हे कारणीभूत असल्याचा आरोप केशव यांनी केला आहे.