Pune To Kolhapur Train | आपल्याकडे दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. दिवाळीच्या सणाला लहान मुले आणि चाकरमान्यांना बऱ्याच सुट्टया देखील मिळतात. हे बघता दिवाळीच्या सणासाठी अनेक जण आपापल्या गावी जातात. यामुळे रेल्वेगाडयांना मोठी गर्दी असते. हीच गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वे विभागाच्या माध्यमातून विशेष रेल्वे गाड्याचे नियोजन केले जाते. अश्याच प्रवाश्यांचा मागणीचा विचार करून पुणे – कोल्हापूर – पुणे अशी विशेष गाडी पाच नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पुणे – कोल्हापूर प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोल्हापूरसाठी विशेष रेल्वेगाडी सुरु करणार : Pune To Kolhapur Train
पुण्यावरून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाश्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे यामार्गांवर विशेष कोल्हापूर, पुणे मुंबई दरम्यान धावणारी सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू केली जात आहे. ही गाडी सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ह्याचा विचार करत रेल्वे प्रशासनाने प्रवाश्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने पुणे – कोल्हापूर – पुणे ही विशेष रेल्वेगाडी सुरु करण्याचे धोरण अवलंबले आहे. पुणे – कोल्हापूर – पुणे ही रेल्वेगाडी रेल्वे विभागाच्या माध्यमातून ५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत दररोज चालवण्यात येणार आहे.
20 रेल्वे स्थानकावर देण्यात येणार थांबा :
पुणे – कोल्हापूर – पुणे या गाडीला सर्व महत्वाच्या २० रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना ही गाडी खूपच फायदेशीर ठरणार आहे. या गाडीला १६ कोच असणार आहेत.जवळपास महिन्याभराच्या कालावधीत या गाडीच्या ११४ फेऱ्या होणार आहेत. या सेवेसाठी महाराष्ट्र एक्स्प्रेसचा रेक वापरण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. विशेष रेल्वेगाडी (Pune To Kolhapur Train)संबंधित नोटीफिकेशन शुक्रवारी रेल्वे प्रशासनाकडून काढण्यात आले आहे.
कसे असेल पुणे – कोल्हापूर – पुणे रेल्वेगाडीचे वेळापत्रक :
पुणे – कोल्हापूर ही गाडी पुण्यातून रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार आहे. ती गाडी कोल्हापूर येथे पहाटे ५ वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. तर, कोल्हापूर येथून ही गाडी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून ४५ मिनिटांनी पुण्यात दाखल होईल.