हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे (Pune) हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक स्थळ असून पुण्याला विद्येचे माहेरघर सुद्धा म्हंटल जात. अनेक ऐतिहासिक आणि सुंदर अशा ठिकाणांनी पुणे नटलेले आहे. सध्या उन्हाळा सुरु असून अनेकांना या दिवसात सुट्ट्या असतात. त्यामुळे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी अनेकजण फिरायला जाण्याचा बेत आखतात. तुम्ही सुद्धा सुट्ट्यांमध्ये पुणे शहरात जायचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला पुण्यातील अशी काही 5 पर्यटन स्थळे (Pune Tourist Places) सांगणार आहोत जे तुम्ही एक दिवसाच्या सुट्टीत सुद्धा फिरू शकता आणि पर्यटनाचा आनंद घेऊ शकता.
1) शनिवारवाडा- Shaniwarwada
शनिवारवाडा म्हणजे पुण्यातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण… शनिवारवाडा १७३२ मध्ये पेशवे घराण्याने बांधला होता. पेशव्यांचा दरबार येथेच होता. पेशव्यांच्या घरांतील मुलामुलींची लग्ने याच वाड्यात होत. शनिवारवाडा म्हणजे पेशव्यांच्या स्थापत्य पराक्रमाचा एकप्रकारचा पुरावाच…. आता या वास्तूंमधील सर्व अवशेष नष्ट झाले आहेत परंतु वाड्याचा पाया आणि तटबंदीचा भाग आजूनही कायम आहे. शनिवारवाडा बघताना ऐतिहासिक वास्तू पाहण्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळू शकतो. शनिवारवाड्याकडे जाण्यासाठी तुम्हाला पुणे स्टेशनवरून रिक्षा किंवा बसची सोय आहे.
2) सारस बाग – Saras Baugh
सारस बाग हे पुण्यातील स्वारगेटजवळ असलेले एक ऐतिहासिक उद्यान आहे. या बागेत तुम्हाला हिरवगीगार झाडे आणि विविध रंगांची फुले पहायला मिळतात. खास गोष्ट म्हणजे सारस बागेत एक छोटस तळ असून त्यामध्ये एक गणपतीचे मंदिर सुद्धा आहे. सारसबागेत बोटींगसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच लहान मुलांसाठी फुलराणी नावाची एक रेल्वेदेखील आहे ज्यामध्ये बसून ते मनसोक्त आनंद घेऊ शकतात. या बागेत वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सवही आयोजित केले जातात. तुम्ही सुद्धा पुण्याला जायचा विचार करत असाल तर एक दिवस सारसबागेत नक्की भेट द्या.
3) राजीव गांधी प्राणीसंग्रहालय (Rajiv Gandhi Zoological Park)
राजीव गांधी प्राणीसंग्रहालय हे पुण्यातील कात्रज परिसरात आहे. या संग्रहालयात तुम्ही सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंत जाऊ शकता. या प्राणीसंग्रहालय हत्ती, वाघ, सांबर, अस्वल, हरण, काळवीट, मोर अशी विविध प्राणी आणि पक्षी तुम्हाला पहायला मिळतील. याशिवाय याठिकाणी तुम्हाला २२ पेक्षा जास्त सापांच्या प्रजाती दिसतील. कात्रज आणि स्वारगेट पासून हे संग्रहालय जवळ असून पर्यटकांची याठिकाणी मोठी गर्दी पहायला मिळते.
4) तुळशीबाग – Tulsi Bagh
पुण्यात गेल्यावर शॉपिंग करायची असेल तर एकच ठिकाण सर्वात आधी डोळ्यासमोर येत ते म्हणजे तुळशीबाग.. पुण्यातील गजबजणारी बाजारपेठ म्हणून तुळशीबागेचा उल्लेख करावा लागेल. तुळशीबागेत तुम्हाला हवी ती कपडे अगदी स्वस्त किमतीत मिळतात. याशिवाय, स्वयंपाकघरातील वस्तूंपासून, सौंदर्यप्रसाधने, खेळणी, लहान मुलींची भातुकलीची खेळणी असे सर्व काही इथे मिळते. त्यामुळे दररोज इथे नागरिकांची मोठी गर्दी पहायला मिळते. तुम्हालाही जर एकाच छताखाली सर्व वस्तूंची खरेदी करायची असेल तर तुळशीबाग हे तुमच्यासाठी बेस्ट ठिकाण आहे.
5) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर (Dagadusheth Halwai Ganapati Temple)
पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे मंदिर सर्वात प्रसिद्ध आहे. मुख्य पुणे शहरात असलेल्या या मंदिराला एक मोठी आणि वैभवशाली परंपरा आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे एके काळचे पुण्यातील प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. परंतु त्यावेळी आलेल्या प्लेगच्या साथीत त्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांनी पुण्यात गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. तेव्हापासून दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. दररोज हजारो भाविक या मंदिरात येऊन गणपतीचे दर्शन घेतात. तुम्ही सुद्धा फिरण्यासाठी पुण्याला गेला असाल तर नक्कीच या मंदिराला भेट द्या.