अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास शिक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । मिरज तालुक्यातील बामणोली येथे अल्पवयीन मुलीवर घरात कुणी नसल्याचा फायदा उचलत अत्याचार करणार्‍या सावत्र बापास 20 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. राजू सर्जेराव नांद्रे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सदरची घटना 9 नोव्हेंबर 2019 रोजी घडली होती. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी शिक्षा सुनावली. पिडीत मुलीची आई ही तिच्या लहान तीन मुली व एका मुलासोबत मिरज येथे राहत होती. पीडितेच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते.

आरोपी राजू सर्जेराव नांद्रे याने पिडीत मुलीच्या आईसोबत ओळख वाढवून तिच्यासोबत लग्न केले. त्यानंतर फिर्यादी ही तिच्या लहान तीन मुली व एक मुलगा आणि आरोपीसोबत बामणोली येथील दत्तनगर येथे भाड्याच्या खोलीमध्ये राहु लागली. दिनांक 9 नोव्हेंबर 2019 रोजी पिडित मुलीची आई ही कामावर गेली असताना आरोपीने इतर दोन्ही मुलींना घराबाहेर घालवून पिडीत मुलीस तिच्या आईस मारण्याची धमकी देवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर पीडितेची आई ही घरी आल्यानंतर पिडीत मुलीने सदरचा प्रकार तिला सांगितला. त्यावेळी फिर्यादीने आरोपीस असे का केलेस? असे विचारले असता त्याने तिलासुध्दा मारहाण केली. त्यानंतर पिडितेच्या आईने कुपवाड एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या प्रकरणी सखोल तपास करून तत्कालीन सहाय्यक पोलीस निरक्षक निरज उबाळे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांच्या न्यायालयात सुरु होती. याकामी सरकार पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. पिडीत मुलगी तसेच वैद्यकिय अधिकारी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. उपलब्ध साक्षीपुराव्याच्या आधारे आरोपी राजू सर्जेराव नांद्रे यास दोषी धरून वीस वषार्ंची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.