सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
महाबळेश्वर तालुक्यातील केळघर परिसरात गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे पुनवडी पुलाचा भराव वाहून गेला आहे. या पुलाचा भराव वाहिल्याने 10 ते 12 गावांचा केळघर- मेढ्याशी असणारा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या 10 दिवसापासून पावसाने कमी- जास्त प्रमाणात हजेरी लावली आहे. तर जावळी, महाबळेश्वरसह कोयना धरण क्षेत्रात धुवाॅंधार हजेरी लावली असल्याने अनेक ठिकाणची गावे संपर्कहीन होवू लागली आहेत.
पुनवडी पुलाचा भराव वाहून गेल्याने ग्रामस्थांचा केळघर मेढ्याच्या बाजारपेठेशी संपर्क पूर्णपणे तुटला असून याचा सर्वाधिक फटका विद्यार्थी, आजारी रुग्णांना बसणार आहे. या पुलाची उंची वाढवण्याची मागणी वेळोवेळी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती. मात्र या पुलाच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभाग मुहूर्ताची वाट बघत असल्याने याचा विनाकारण मनस्ताप मात्र ग्रामस्थांना करावा लागणार आहे. पुनवडी पुलावरून ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी प्रवास करू नये, हा पूल वाहतुकीस धोकादायक झाल्याचे सरपंच सुरेश पार्टे यांनी सांगितले. पुनवडी येथील पुलाचा भराव आज संततधार पावसाने वाहून गेल्याने या पुलावरून आता प्रवास करणे धोकादायक झाले आहे. पुनवडी पुलाची उंची वाढवण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी केली होती. मात्र याबाबत प्रशासनाने गांधारीची भूमिका घेतल्याने जोरदार पावसामुळे या पुलाचा भराव वाहून गेला आहे.
पुनवडी पुलावरून पुनवडी, केडंबे, तळोशी, भुतेघर, बाहुळे, वाळजवाडी, बोंडारवाडी यासह परिसरातील गावातील ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामोरे जावे लागणार आहे. या पुलावरून शालेय विद्यार्थी ही आपला जीव धोक्यात घालून शाळेसाठी केळघर, मेढ्याकडे येत असातात. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीत या पुलाचा भराव वाहून गेला होता. जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी त्यावेळी भराव टाकून पुल वाहतुकीस सुरू केला होता. परिसरात पावसाने रौद्ररूप धारण केले असून बुधवारी संध्याकाळी पडलेल्या जोरदार पावसामुळे पुनवडी पुलाचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे या पुलावरून प्रवास करणे आता धोकादायक झाले आहे. गेले वर्षभर प्रशासनाने या पुलाच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले नाही. बांधकाम विभाग ठेकेदारांचे हित जोपासत असल्याने सामान्य जनतेला कोण वाली आहे का नाही, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.