धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर 30 किलो सोन्याची खरेदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर औरंगाबादेत तब्बल 30 किलो सोने खरेदी करून दिवाळी पर्वास उत्साहात प्रारंभ केला आहे. बऱ्याच दिवसानंतर ज्वेलर्सच्या लहान-मोठ्या शोरूम मध्ये मंगळवारी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली तर अनेक मोठ्या शोरूममध्ये तर पाय ठेवायलाही जागा नव्हती. दिवाळीला नुकतीच सुरुवात झाली आणि शहर रोषणाईत न्हाऊन गेले. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशीला खरेदी शुभ मानली जाते. यामुळे बाजारात विशेषतः काल दुपारनंतर प्रचंड गर्दी उसळली होती.

काल धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मंगळवारी सोने व दागिने खरेदीला अनेकांनी प्राधान्य दिल्याचे दिसून आले. सराफा बाजार, कासारी बाजार, जालना रोड, त्रिमुर्ती चौक, गारखेडा चौक, शिवाजीनगर तसेच सिडको-हडको भागातील सोन्याचा दालनात मोठी वर्दळ होती. जालना रोडवरील बहुतांश शोरूम मध्ये तर पाय ठेवायलाही जागा नव्हती. पार्किंग विपुल झाल्या होत्या. सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी सांगितले की मंगळवारी प्रति दहा ग्राम सोन्याचा भाव 49 हजार 700 रुपये होता. दिवसभरात शहरात सुमारे तीस किलो सोने विक्री झाले आहे. सोने-चांदी व्यवहारात सुमारे 15 कोटींची उलाढाल झाली. बाजारामध्ये बऱ्याच दिवसानंतर अशी गर्दी पाहायला मिळाली. चारचाकी वाहनांच्या कमतरतेमुळे अनेकांनी सोने खरेदीला प्राधान्य दिले आहे.

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर लक्ष्मीपूजनासाठी केरसुनी खरेदी केली जाते. विशेष म्हणजे एका केरसुनी सोबत एक लहान केरसुनी मोफत दिली जात होती. लक्ष्मीचे छायाचित्र असलेल्या लाल वह्याही धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात विक्री झाल्या. लाल रंग व निळ्या रंगाचे बोल पेनही आवर्जून खरेदी केले जात होते. दिवाळी एका दिवसावर येऊन ठेपल्याने बाजारात कपडे खरेदीसाठी झुंबड उडाली होती.

Leave a Comment