जळगाव | एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर जळगाव जिल्ह्यात भाजपाला रामराम करणाऱ्यांची संख्या दिवसेंन दिवस वाढत चाललेली आहे. आज मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपला जोरदार धक्का दिलाय. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगरमधील भाजपच्या 10 आजी- माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत होते.
मुक्ताईनगरमधील 7 विद्यमान आणि 3 माजी नगरसेवकांचा समावेश आहे. नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशामुळे जळगावमध्ये भाजपला हा दुसरा मोठा धक्का बसला आहे. पूर्वी राज्यातील भाजपचे सर्वात मोठे नेते आणि विरोधी पक्षनेते राहिलेले एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर भाजपाला मोठे धक्के बसत असल्याचे पहायला मिळत आहे. आज शिवसेनेत नगरसेवकांनी प्रवेश केल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांची ताकद वाढली असून विरोधी भाजपाला चांगलाच बॅकफूटवर गेलेला पहायला मिळत आहे.
काही दिवसापूर्वी खडसेंच्या माध्यमातून भुसावळातील 13 नगरसेवकांसह त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन, नगरपालिका निवडणुकीपूर्वीच राजकीय भूकंप घडवून आणला होता. आज केलेल्या नगरसेवकांच्या प्रवेशामुळे जळगावमधील भाजपाकडे असलेली नगरपालिकाही हातातून जाईल असे चित्र दिसत आहे.