औरंगाबाद – मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. तरुणीने चालत्या रिक्षातून उडी मारण्याची घटना ताजी असतानाच आता मुकुंदवाडी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. भाजीपाला आणण्यासाठी जात असताना रस्त्यावर खेळत असलेल्या पाच वर्षाच्या मुलीवर आईने लक्ष ठेवण्यास सांगितलेल्या 17 वर्षीय तरुणाने या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेमुळे खरंच औरंगाबाद शहरात महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत 17 वर्षीय तरुणाविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी पीडित मुलीची आई व तीन इतर महिला सोबत भाजीपाला अणण्यासाठी शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास परिसरातील बाजारात जात होत्या. पीडीते सोबत तिच्याच वयाचा शेजारचा एक मुलगा खेळत होता. दोघेही लहान असल्याने पीडितेच्या आईने बाहेर मोबाईल बघत असलेल्या 17 वर्षीय तरुणास आपल्या लहान मुलीकडे लक्ष देण्यास सांगितले. तसेच आम्ही एका तासात परत येत असल्याचे ही कळवले. त्यामुळे घराशेजारील चारही महिला बाजारात गेल्यामुळे आजूबाजूला कोणीही नव्हते. याचाच फायदा घेत तरुणाने गोड बोलून त्या लहान मुलीला तिच्याच घरात नेले व तिच्यावर अत्याचार केला, आणि नंतर तेथून त्याने पोबारा केला. भाजीपाला घेऊन जेव्हा पीडितेची आई घरी आल्यावर मुलगी रडत होती, तिला सांगता येत नव्हते. शेवटी आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारल्यानंतर आईला सर्व घटनाक्रम समजला. पीडितेचे वडील कामगार असल्याने ते सायंकाळी उशिरा घरी आले. त्यांना सविस्तर घटना सांगितल्यावर रविवारी सकाळी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात पिडीतेच्या आईने तक्रार दिली त्यानुसार तरुणाविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, तक्रार दाखल होताच गुन्हा दाखल करीत आरोपी बालकाला ताब्यात घेतले. या घटनेचा तपास मार्गदर्शक नियमानुसार उपनिरीक्षक वैशाली गुळवे यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी ही महिला दक्षता समितीच्या सदस्यांना बोलवत ईन कॅमेरा जबाब नोंदवला. तसेच तरुणाचाही जबाब घेतला. यात त्याने अत्याचार केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. इतच या प्रकरणामुळे पुन्हा एकदा औरंगाबाद शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे का ? तसेच शहरात महिलांना वावरणे कितपत सुरक्षित आहे ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.