R Ashwin : भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने मोठा भीमपराक्रम केला आहे. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळींचा टप्पा पूर्ण केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सलामीवीर झॅक क्रोवलेला बाद करत अश्विनने हा मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. अश्विनच्या आधी माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनीच भारताकडून कसोटी मध्ये ५०० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत. कुंबळेच्या नावावर ६१९ बळी आहेत. तर श्रीलंकेचा मुथैया मुरलीधरन या यादीत अग्रस्थानी असून त्याच्या नावावर 800 विकेट आहेत.
98 व्या कसोटीत अश्विनने घेतले 500 बळी – R Ashwin
अश्विनने 98 व्या कसोटी सामन्यात ही ५०० बळी घेण्याची कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 500 बळी घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे, मुरलीधरणने त्याच्या 87 व्या कसोटीत ही कामगिरी केली. तर माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळेने 105 कसोटी सामन्यांमध्ये हा विक्रम केला होता. ऑस्ट्रेलियाचा दिवंगत फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने आपल्या 108 व्या कसोटीत हा विक्रम केला होता. म्हणजेच सर्वात वेगवान 500 बळी घेण्याच्या बाबतीत कुंबळेने वॉर्न आणि कुंबळेला मागे टाकले आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी पूर्ण करणारा अश्विन (R Ashwin) हा जगातील नववा आणि फिरकीपटूंच्या बाबतीत पाचवा गोलंदाज ठरला आहे. श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने कसोटीत सर्वाधिक ८०० विकेट्स घेतल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नने ७०८ बळी, इंग्लडच्या जेम्स अँडरसनने ६९५ बळी, भारताच्या अनिल कुंबळे यांनी 619 बळी घेतले आहेत. इंग्लडच्याच स्टुअर्ट ब्रॉडने 604 बळी, ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मैकग्राने 563 विकेट, वेस्ट इंडिजच्या कोर्टनी वॉल्श यांनी 519 बळी आणि ऑस्ट्रेलियाच्या नाथन लियोन ने 517 विकेट घेतल्या आहेत.