कल्याणमध्ये गावगुंडांचा नंग्या तलवारी नाचवत धिंगाणा, CCTV फुटेज आले समोर

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याणमध्ये दोन गावगुंडांनी भररस्त्यात तलवारी नाचवून धिंगाणा घातला आहे. कल्याण पूर्वेकडील म्हसोबा चौकात हा सगळा प्रकार घडला आहे. यावेळी एका तरुणावर जीवघेणा हल्लासुद्धा करण्यात आला. अजय शिरसाठ असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी तरुणांनी जुन्या वादातून अजयला शिवीगाळ करत त्याच्यावर हल्ला केला. या गावगुंडांचा हैदोस सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. नागेश दळवी आणि संदीप राठोड अशी या आरोपी तरुणांची नावे आहेत. कोळसेवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हसोबा चौकातील प्रशांत बारजवळ गावगुंडांचा हैदोस कल्याण पूर्वेच्या म्हसोबा चौकातील प्रशांत बारजवळ बुधवारी रात्री 12 च्या सुमारास हा प्रकार घडला. या ठिकाणी नागेश दळवी आणि संदीप राठोड हे दोन गावगुंड हातात तलवारी घेऊन हैदोस घालत होते. हे दोघे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला थांबवून त्यांच्यावर दमदाटी करत होते.

यादरम्यान अजय शिरसाठ हा तरुण त्याच्या मित्रासोबत म्हसोबा चौकातून जात असताना या दोघांनी त्याला आवाज देऊन थांबवले. यानंतर या दोघांनी जुना वाद उकरून काढून त्याला शिविगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर संदिपने नागेशच्या हातातील तलवार घेऊन अजयच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात अजय जखमी झाला असून त्याला उपचारासाठी केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी नागेश आणि संदीप यांच्याविरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.