हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिग्गज भारतीय खेळाडू राहुल द्रविड यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज दाखल केला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं मुख्य प्रशिक्षकपदासह अनेक पदांसाठी अर्ज मागवले होते. त्यापैकी मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची आजची अंतिम तारीख होती. या पदासाठी आधीपासूनच राहुल द्रविड यांचे नाव आघाडीवर होते.
बीसीसीआयने बऱ्याच काळापासून मुख्य प्रशिक्षकासह, बोलिंग कोच आणि फिल्डिंग कोच पदासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी रवी शास्त्रीनंतर मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविडला संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा होती. पण द्रविडने यामध्ये रस दाखवला नव्हता. पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार द्रविडने अधिकृतरित्या या पदासाठी अर्ज केला आहे.
Former India captain Rahul Dravid applies for position of national team's head coach: BCCI source
— Press Trust of India (@PTI_News) October 26, 2021
कोण आहेत राहुल द्रविड-
राहुल द्रविड भारताचा दिग्गज माजी फलंदाज आहे. राहुल द्रविड यांनी भारतीय संघाचे कर्णधारपदही भूषवले आहे. यापूर्वी, द्रविडनं २०१५ ते २०१९ या कालावधीत भारत अ व १९ वर्षांखालील संघासोबत काम केलं आहे. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अनेक युवा खेळाडूंनी राष्ट्रीय संघात आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली २०१८ साली १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती.